जळगाव लाईव्ह न्यूज । पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी दिलासादायक घडामोड समोर आली आहे. डोनाल्ड ट्रंप यांनी इराणसोबत दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची घोषणा केल्यानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीतील परिस्थिती हळूहळू पूर्ववत होण्याची चिन्हे दिसत आहेत. या निर्णयामुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठा सुरळीत होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

या युद्धविरामानंतर इराण नेही होर्मुझची सामुद्रधुनी जहाजांसाठी सुरक्षितपणे खुली करण्यास सहमती दर्शवली आहे. त्यामुळे काही दिवसांपासून अडकून पडलेली तेल आणि गॅस वाहतूक पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मुकेश मंगल यांनी सांगितल्यानुसार 46 हजार 650 टन एलपीजी घेऊन जाणारा ‘ग्रीन सान्वी’ हा टँकर 7 एप्रिल रोजी भारतात पोहोचेल असं सांगण्यात आलं होतं. तर 15 हजार 500 टन गॅस घेऊन जाणारा ‘ग्रीन आशा’ हा टँकर 9 एप्रिल रोजी भारतीय किनारपट्टीवर पोहोचेल.
भारताला मिळणार मोठा दिलासा…
भारत आपल्या स्वयंपाकाच्या गॅसच्या गरजेपैकी सुमारे 60 टक्के गरज आयातीद्वारे भागवतो, त्यापैकी सुमारे 90 टक्के गॅस पश्चिम आशियातून येतो. गेल्या काही दिवसांपासून देशात LPG सिलेंडर आणि इंधनाचा तुटवडा भासत होता. पण आता दोन आठवड्यांसाठी युद्ध थांबल्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाडे सुरक्षितपणे जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे भारताला मोठा दिलासा मिळणार आहे…










