जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२६ । देशातील नागरिक आणि विशेषतः बळीराजासाठी यंदाच्या मान्सूनबाबत एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) २०२६ या वर्षासाठी नैऋत्य मान्सूनचा पहिला अधिकृत अंदाज जाहीर केला असून, यंदा देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाचे महासंचालक डॉ. एम. मोहापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत देशामध्ये सरासरीच्या ९२ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या निकषांनुसार ९० ते ९५ टक्के पावसाचा अंदाज हा ‘सामान्यापेक्षा कमी’ पावसाच्या श्रेणीत मोडतो. यावर्षी मान्सूनवर एल नीनोचा प्रभाव दिसू शकतो. त्यामुळे पाऊस कमी पडू शकतो आणि तीव्र उष्णता जाणवू शकते.

तज्ञांच्या मते, एप्रिल ते जून या कालावधीत एल नीनो-दक्षिणी दोलन तटस्थ स्थितीत राहण्याची शक्यता असली, तरी जूननंतर मान्सून हंगामात एल नीनो सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे पावसाचे प्रमाण अधिक कमी राहू शकते आणि उष्णतेची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
मात्र डॉ. मोहपात्रा यांनी सांगितले की, मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात (ऑगस्ट-सप्टेंबर) हिंदी महासागरात ‘पॉझिटिव्ह इंडियन ओशन डायपोल’ स्थिती निर्माण होऊ शकते. ही स्थिती मान्सूनसाठी पोषक असते. त्यामुळे दुसऱ्या टप्यात चांगला पाऊस होऊन ‘एल निनो’चा प्रभाव काही प्रमाणात कमी होऊ शकतो. दरम्यान, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनचा अपडेटेड अंदाज येईल. यात चित्र अधिक स्पष्ट होईल.
महाराष्ट्रात कसा असेल पाऊस ?
महाराष्ट्रातील बहुतांश भागात, विशेषतः मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात, नेहमीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. किनारी कोकण विभाग तसेच विदर्भातील काही भागांत तुलनेने पावसाचे वितरण चांगले राहू शकते. सरासरीपेक्षा कमी पावसाचा धोका असल्याने खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.












