जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२६ । मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला असून भारतासह अनेक देशांना इंधन टंचाईची भीती निर्माण झाली आहे. गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे महाराष्ट्रासह देशातील अनेक ठिकाणी हॉटेल बंद ठेवण्याची वेळ हॉटेल व्यावसायिकांवर आली आहे. मात्र आता एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे, ती म्हणजे भारताचं इंधन संकट दूर होणार आहे. याबाबत सरकारकडून महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या माहितीनुसार, नॅचरल गॅसचे दोन मोठे कार्गो लवकरच भारतामध्ये दाखल होणार आहेत. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयातील संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, देशात कच्च्या तेलाचा पुरवठा सध्या सुरळीत सुरू आहे. तेल विपणन कंपन्या (OMC) विविध देशांतून कच्चे तेल खरेदी करत असल्यामुळे इंधन पुरवठा स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

पूर्वी भारतात येणाऱ्या कच्च्या तेलापैकी सुमारे ४५ टक्के तेल Strait of Hormuz मार्गे येत होते. मात्र सध्याच्या परिस्थितीत सरकारने पर्यायी मार्गांचा वापर वाढवला असून आता सुमारे ७५ टक्के कच्चे तेल इतर मार्गांनी भारतात आणले जात आहे. होर्मुज मार्गे येणाऱ्या तेलाचा वाटा आता केवळ २५ टक्क्यांवर आला आहे.
सरकारने नागरिकांना आवाहन केले आहे की, गॅस सिलिंडर बुकिंगसाठी अनावश्यक घाई करू नये. गॅसचा तुटवडा होणार नाही यासाठी पुरवठा आणि वितरण व्यवस्थेवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. जागतिक तणावाच्या या काळातही देशात इंधन संकट टाळण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.











