ट्रम्पच्या टॅरिफची दहशत अन् भारतीय शेअर बाजारात हाहाकार ; सेन्सेक्ससह निफ्टीत मोठी घसरण

फेब्रुवारी 11, 2025 2:54 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ फेब्रुवारी २०२५ । गेल्या आठवड्यापासून देशांतर्गत शेअर बाजारात (Indian stock market) घसरण दिसून येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या निर्णयाचे परिणाम भारतीय शेअर बाजारावर होत असून सोमवारनंतर आज मंगळवारी देखील शेअर बाजार जोरदार आपटल्याचं पाहायला मिळालं.

share market 1

आज दुपारी अडीच वाजेपर्यंतच्या व्यवहारात सेन्सेक्स तब्बल १,१८० अंकांनी घसरून ७६,१२५ पर्यंत खाली आला. तर निफ्टी ३६६ अंकांनी घसरून २३,०२५ च्या खाली घसरला. सलग पाचव्या सत्रांत सेन्सेक्स- निफ्टी घसरले आहेत. सेन्सेक्स आणि निफ्टीची ही आजची घसरण प्रत्येकी १.५ टक्के एवढी आहे

शेअर बाजारातील मोठ्या घसरणीमुळे खाजगी बँका आणि ऑटोमोबाईल क्षेत्रासह सर्व क्षेत्रांच्या शेअर्समध्ये कमकुवतपणा दिसून येत आहे. दुपारी, सेन्सेक्समधील सर्व ३० शेअर्स घसरणीसह व्यवहार करताना दिसले. याशिवाय, जागतिक बाजारपेठेतील नकारात्मक भावनेचा परिणाम भारतीय बाजारपेठेत दिसून आला. दरम्यान, बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ९.८ लाख कोटींनी कमी होऊन ४०७ लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ‘टॅरिफ वॉर’ सुरु झाला आहे. मागील आठवड्यात त्यांनी केलेल्या घोषणेमुळे भारतीय व्यापाऱ्यांची चिंता वाढली. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टील आणि अॅल्यूमिनियमच्या वस्तूवर आयातशुल्क २५ टक्के लागू करण्याची घोषणा केली होती. या क्षेत्राशी निगिडीत भारतीय कंपन्यांचे अमेरिकेत मोठे व्यवहार होतात. भारतातून अमेरिकेत दरवर्षी अब्जो डॉलरचं स्टील आणि अॅल्यूमिनियम निर्यात केलं जातं.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेनंतर Tata steel, JSW Steel, Nalco च्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. सोमवारी देखील या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली होती. त्यानंतर मंगळवारी देखील शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now