गुरूवार, जून 8, 2023

‘मनरेगा’च्या मजुरांसाठी आनंदाची बातमी! मजुरीत झाली वाढ, आता ‘एवढे’ रुपये मिळणार?

जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२३ । सध्या दिवसेंदिवस महागाई वाढत असून यामुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघत आहे. वाढत्या महागाईने घर चालविणे कठीण झाले आहे. दरम्यान, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (MGNREGA) मजुरांच्या मजुरीत वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ १ एप्रिलपासून लागू करण्यात आली आहे.

बेरोजगारांच्या हाताला काम देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली आहे. या योजनेत ५० टक्के कामे इतर यंत्रणांच्या माध्यमातून केली जातात. या योजनेचा केंद्रबिंदू ग्रामीण परिसर असल्यामुळे कामांचे नियोजन, देखरेख व सनियंत्रणाचे काम ग्रामपंचायतीकडे सोपविले आहे. ग्रामसेवकाच्या मदतीसाठी ग्रामसभेत रोजगारसेवकाची निवड करण्यात आली आहे. या योजनेतून सर्वसामान्य आणि गरजवंतांना वर्षभरातील किमान १०० दिवस रोजगार उपलब्ध झाला असून, त्यातून त्यांचे जगणे सुसह्य झाले आहे.

इतक्या रुपयांची झाली वाढ
सध्या महागाई वाढली आहे. त्यातून २५६ रुपये प्रतिदिवस मजुरीत मजुरांना काम करणे परवडेनासे झाले आहे. त्याची दखल घेऊन केंद्र शासनाने १ एप्रिल २०२३ पासून रोजगार हमी योजनेच्या कामावर काम करणाऱ्या मजुरांच्या मजुरीत प्रतिदिवस १७ रुपयांनी वाढ केली आहे.

त्यामुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील कामांवर कामे करणाऱ्या मजुरांना आता २५६ रुपयांऐवजी २७३ रुपये प्रतिदिवस मजुरी मिळणार आहे. त्यामुळे महागाईमध्ये मजुरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.