जळगाव लाईव्ह न्यूज । २९ सप्टेंबर २०२२ । जळगाव शहर महानगरपालिकेचा गलथान कारभार आता काही नवीन बाब राहिलेला नाही. १८ महिने उलटून गेले तरी देखील निधीचा योग्य वापर न केल्यामुळे आता मनपाला मिळालेला निधी पुन्हा जाण्याची शक्यता आहे. घडलेल्या प्रकारामुळे सर्वपक्षीय नगरसेवक अत्यंत नाराज असून येत्या महासभेत सर्व नगरसेवक मिळून प्रशासनाला धारेवर धरणार आहेत.

जळगाव शहरातील सध्याची असलेली परिस्थिती लक्षात घेता अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. नागरिक मोठ्या प्रमाणावर शहराच्या झालेल्या दुरवस्थेसाठी नगरसेवकांना जबाबदार धरतात. नागरिक थेट नगरसेवकांना याबाबतचा जाब विचारतात. महानगरपालिका प्रशासन करत असलेल्या चुकांमुळे सर्व भुर्दंड हा नगरसेवकांना सोसावा लागत आहे. यामुळे आता महासभेमध्ये नगरसेवक आक्रमक पवित्रा घेतील असे चित्र निर्माण झाले आहे. नुकतीच याबाबत महानगरपालिकेमध्ये बैठकही घेण्यात आली यावेळी महानगरपालिकेतील नगरसेवकांनी प्रशासनाला खडे बोल सुनावले होते.
नगरसेवक नितीन बरडे यांच्याशी याबाबत चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, जळगाव शहर महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणावर निधी परत जाऊ शकतो. १८ महिन्यापूर्वी हा निधी देण्यात आला होता. मात्र जळगाव शहर महानगरपालिकेच्या गलधनकारभारामुळे अजूनही कामांना सुरुवात झालेली नाही. अनेक कामांचे टेंडर ही निघाले नाहीत. हा सगळा प्रकार घडत असतांना नागरिक आम्हालाच या बाबत प्रश्न विचारत आहेत. मात्र महानगरपालिकेच्या कारभारामुळे नगरसेवकांची प्रतिमा नागरिकांमध्ये मालिन होत आहे.
प्रशासन योग्यरीतीने काम करत नसल्यामुळे नागरिक आम्हाला प्रश्न विचारत आहे. १८ महिन्यापूर्वी निधी मिळाली मात्र अजूनही काम पूर्ण झाले नाही. याबाबत महासभेमध्ये मी स्वतः प्रशासनाला याबाबत जाब विचारणार आहे. माझ्या प्रभागातील गुरुकुल कॉलनी, विद्या नगर, जय नगर, पार्वती नगर, अनंत सोसायटी, रामदास कॉलनी, गणपती नगर या भागांमध्ये निधी मिळूनही काम पूर्ण झालेले नाही, असे बरडे यांनी सांगितले.