जळगाव लाईव्ह न्यूज । ३ सप्टेंबर २०२४ । जळगाव जिल्ह्यात मागील दोन तीन दिवसापासून जोरदार पाऊस सुरु असून यामुळे काही ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. याच दरम्यान जामनेर व बोदवड तालुक्यातील एक धक्कादायक घटना समोर आलीय. नदीच्या पुरामध्ये दोन जण वाहून गेल्याची घटना घडली आहे.
शहापूर(ता. जामनेर) येथील इसम हा खडकी नदीच्या पुरामध्ये वाहून गेला तर तर दुसरीकडे बोदवड तालुक्यातील हरणखेड तलावातदेखील एक तरुण वाहून गेल्याची घटना समोर आलीय. दरम्यान, वाहून गेलेल्या बोदवड तालुक्यातील तरुणाचा मृतदेह आढळून आला असून जामनेरातील तरुणाचा मृतदेह शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते.
या घटनेबाबत असे की, जामनेर तालुक्यातील शहापूर येथील रहिवासी मोहन पंडित सूर्यवंशी (वय ४०) हे खडकी नदीच्या जवळ गेले असताना तेथे पुराच्या पाण्यात वाहून गेले. तर दुसऱ्या घटनेत, बोदवड तालुक्यालगतच्या नदीत गोपाल प्रभाकर वांगेकर (वय २८) हा शेतकरी तरुण बैल धुताना सोमवारी सकाळी बैलासह वाहून गेला. पोळ्याच्या दिवशीच्या घटलेल्या या दुर्घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. त्याचा मृतदेह नदीतील झुडपांमध्ये एनडीआरएफच्या पथकाने बोटीच्या साहाय्याने शोधून काढला. दरम्यान, बैल मात्र सापडला नाही.
दरम्यान, जामनेर तालुक्यातील मोहन पंडित सूर्यवंशी यांचा मात्र अद्याप मृतदेह सापडला नाहीत. त्यामुळे सकाळी युद्धपातळीवर त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू होते.