⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

पुर्णा नदीपात्रात अवैध गाळ उपसा; प्रशासनाचे दुर्लक्ष

जळगाव लाईव्ह न्युज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील जुने खामखेडा शिवारात पुर्णा नदीपात्रातील गाळ माती चिमणी भट्टे तसेच वीटभट्ट्यावर डंपरच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर विनापरवानगी वाहतुक केली जात आहे. याबाबत मनसे तालुकाध्यक्ष मधुकर भोई यांनी तहसीलदार श्वेता संचेती यांना हि बाब कळवली, यावर कारवाई केली जाईल असे सांगितले. मात्र संबंधित अवैध गाळमाती वाहतुकमाफियांवर कोणत्याच प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याने भोई यांनी पुन्हा नायब तहसीलदार झांबरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली असून या प्रकाराकडे प्रशासनाकडुन दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान नदीपात्रालगत ऐन उन्हाळ्यात गुरा-ढोरांना चराईसाठी असलेले कुरण मोठ्या प्रमावर नष्ट होत आहे. त्यामुळे खामखेडा व मुक्ताईनगर येथील पशुपालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच संबंधित प्रकाराला आळा घालण्यात यावा अशी मागणी वजा अपेक्षा संबंधित पशुपालकांकडुन होत आहे.

खामखेडा पुलाजवळील नदीपात्रालगतचे क्षेत्र हतनुर जलाशयाच्या बुडीत क्षेत्रात असून पाटबंधारे विभागाकडुन शेतकऱ्यांना सदर हद्दीतील गाळ काढण्यास परवानगी नाही, तर केवळ ना-हरकत दाखला दिला जातो. शेतकऱ्यांना शेतात गाळ टाकण्यासाठी गाळ काढणे व शेतीकामासाठी शेतात टाकणे याप्रक्रियेसाठी नि:शुल्क आहे. मात्र मोठमोठे विटभट्टे व काही चिमणीभट्टे यांना वाहतुकीसंदर्भात तहसीलसह अन्य विभागाची राॅयल्टी व परवानगी लागत असताना गाळमाफीया शासकीय नियमांचे उल्लंघन करुन डंपरद्वारे मोठ्या प्रमाणावर वाहतुक करीत असुन हजारो ब्रास गाळमातीचा साठवा करीत असल्याचे वास्तव्य आहे. यावर्षी पाणी पातळी स्थीर राहील्यामुळे उंच जागेवरील गाळ उत्खनन जोरात सुरु असुन नदीपात्रालगतच्या भागात ऐन उन्हाळ्यात परीसरातील गुरा-ढोरांचे कुरण या उत्खननामुळे नष्ट होत असुन वर्षानुवर्षे गुरे चारणाऱ्या पशुपालकांमध्ये या प्रकारामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच शासनाचा लाखो रुपयांचा महसुल बुडत असुन संबंधित गाळ माती माफीया शेतकऱ्यांच्या नावाखाली वीटभट्टेचालकांना गाळमाती पुरवित असल्याच्या वस्तुस्थितीला नेमकं जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.