⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

कुलर वापरताना कशी घ्यावी स्वतःची आणि कुटूंबाची काळजी ?

जळगाव लाईव्ह न्यूज | २५ एप्रिल २०२३ |  तापमान वाढल्याने कुलरचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे. मात्र खबरदारी न घेतल्याने अपघाताची शक्यता असते. त्यासाठी नागरिकांनी कुलर वापरताना विद्युत सुरक्षेची खबरदारी घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

कुलरसाठी नेहमी थ्री-पिन प्लगचा वापर करावा. कुलरमध्ये पाणी भरण्यापूर्वी कुलरचा वीजपुरवठा बंद करून प्लग काढून ठेवावा म्हणजे कुलरचा विजेशी काहीही संबंध राहणार नाही. पाणी भरताना ते टाकीच्या खाली सांडून बाजूला जमिनीवर पसरणार नाही, याची खबरदारी घ्यावी. पाणी भरल्यानंतर प्लग पिन लावून स्विच चालू करावे. त्यानंतर कुलरच्या कुठल्याही भागाला स्पर्श करू नये. कुलरचे कनेक्शन व वायरिंग अधिकृत कारागिराकडून तपासून घ्यावे. अर्थिंगची तपासणी करून घ्यावी. अर्थिंग व्यवस्थित असल्यास लिकेज करंट येत नाही. कुलरच्या आतील वायर पाण्यामध्ये बुडणार नाही याची काळजी घ्यावी. पंपातून पाणी येत असल्यास वीजपुरवठा बंद करून नंतरच कुलरला हात लावावा. ओल्या हातांनी कुलरला कधीही स्पर्श करू नये.
लहान मुलांना नेहमी कुलरपासून सुरक्षित अंतरावर ठेवावे आणि ती कुलरजवळ खेळणार नाहीत, याबाबत दक्षता घ्यावी. कुलरच्या लोखंडी बाह्यभागात वीजप्रवाह उतरू नये यासाठी कुलरचा थेट जमिनीशी संपर्क येईल, अशी व्यवस्था करावी; जेणेकरून कुलरच्या लोखंडी बाह्यभागात वीजप्रवाह उतरल्यास त्याचा धक्का बसणार नाही. कुलरमधील पाण्याचा पंप ५ मिनिटे सुरू आणि १० मिनिटे बंद ठेवणाऱ्या इलेक्ट्रिक सर्किटचा वापर करावा. यामुळे विजेचीही मोठ्या प्रमाणावर बचत शक्य आहे.
कुलरबाबत माहिती नसल्यास कनेक्शन बदल करू नये. कुलरची दुरुस्ती चालू अवस्थेत न करता प्लग काढून नंतरच काम करावे. कुलरच्या प्लगला जोडलेली वायर खंडित वा जीर्ण झालेली असल्यास बदलून दुसरी लावण्यात यावी. अनेकदा पाण्याची पातळी खोल गेल्याने पंप सुरू करूनही पाणी खेचले जात नाही व तो पंप एअर लॉक होतो. अशावेळी प्रायमिंग करणे आवश्यक असते. मात्र चालू पंपाचे प्रायमिंग करणे टाळावे. कुलर हलवताना प्लग पिन काढून नंतरच त्याची हालचाल करावी. कुलर पंप अधूनमधून बंद करावा. घरामध्ये अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर बसवून घ्यावे. आपल्या दैनंदिन व्यापातून थोडासा वेळ या उपाययोजनांसाठी दिला तर कुलरमुळे होणारे विद्युत अपघात टळू शकतात. त्यामुळे आजच या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.