⁠ 
मंगळवार, एप्रिल 16, 2024

दिवाळीत एरंडोल बस आगाराचे सर्वाधिक उत्पन्न

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२२ । दिवाळीनिमित्त सोडण्यात आलेल्या जादा गाड्यांच्या उत्पन्नात जळगाव जिल्ह्यातील ११ बस आगारामध्ये एरंडोल बस आगाराने सर्वाधिक उत्पन्न मिळवून प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. उत्पन्न वाढीसाठी बस आगार व्यवस्थापक व्ही. एन. पाटील व स्थानक प्रमुख गोविंद बागुल यांनी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवून वाहक व चालक यांनी सुद्धा प्रवासी वाढ करण्यासाठी परिश्रम घेतले त्यामुळे प्रवासी भारमानक विक्रमी वाढवून एरंडोल बस आगाराचे उत्पन्न कमालीचे वाढले आहे.

दिवाळीच्या दिवसात तारीख निहाय एरंडोल बस आगाराचे उत्पन्न पुढीलप्रमाणे दि. २६ ऑक्टोबर रोजी ८ लाख ५० हजार , दि. २७ ऑक्टोबर रोजी ९ लाख ५० हजार , दि. २८ ऑक्टोबर रोजी ८ लाख ४० हजार दिवाळीनिमित्त प्रवाशांची सोय व्हावी म्हणून एरंडोल बस आगाराला दहा नवीन बस गाड्या प्राप्त झाल्या. त्यासाठी नियोजन करण्यात येऊन प्रवाशांची गैरसोय दूर करण्यात आली. एरंडोल ठाणे रातराणी सुरू करण्यात येऊन मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची व मुंबईकडून परत येणाऱ्या प्रवाशांची मोठी सुविधा झाली तसेच दोंडाईचा गाडीमुळे ग्रामीण भागातील जनतेची गैरसोय दूर झाली याशिवाय एरंडोल औरंगाबाद, धरणगाव नाशिक, एरंडोल शिरपूर, एरंडोल सुरत अशा नवीन गाड्या सुरू करण्यात आल्या असून अजूनही त्या गाड्या मार्गावर धावत आहेत त्यामुळे प्रवाशांनी त्याबाबत सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.