⁠ 
गुरूवार, नोव्हेंबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | जळगाव शहर मनपातील ‘हाय व्होल्टेज पॉलिटिकल ड्रामा’

जळगाव शहर मनपातील ‘हाय व्होल्टेज पॉलिटिकल ड्रामा’

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । शहर मनपाच्या इतिहासात पहिल्यांदाच बुधवारी राष्ट्रगीताचा अवमान झाल्याचा प्रकार घडला. मनपातील निंदनीय प्रकारानंतर राष्ट्रगीताचा अवमान झाला म्हणून तक्रार देण्यासाठी मनपा प्रशासन तर पुढे आलेच नाही परंतु सत्ताधारी आणि विरोधक देखील पुढे सरसावले नाही. दोन्ही पक्षातील नेत्यांनी एकमेकांकडे बोट दाखविले. राष्ट्रवादी काँग्रेसने निवेदन देण्याचे मोठेपण दाखविले असले तरी कुणीही थेट तक्रार दाखल केलेली नाही. एकंदरीत ”तेरी भी चूप और मेरी भी चूप’ साधत महासभेतील प्रकार म्हणजे ‘हाय व्होल्टेज पॉलिटिकल ड्रामा’च म्हणावे लागेल.

जळगाव शहर मनपाची सभा बहुतांश वेळीही वादळीच झाली आहे. महासभेत हाणामारी, धक्काबुक्की, महापौरांचा राजदंड पळविणे असे प्रकार नेहमीच झाले आहे. गेल्या दीड वर्षापासून महासभा कोरोनामुळे ऑफलाईन पद्धतीने सुरु होती त्यामुळे नेहमीसारखा वादळी प्रकार पाहायला मिळाला नाही. बुधवारी बऱ्याच महिन्यांनी पहिल्यांदाच मनपाची महासभा ऑफलाईन पद्धतीने पार पडली. भाजपचे नगरसेवक कैलास सोनवणे यांनी सुरुवातीलाच प्रश्न उपस्थित करीत उपमहापौर कुलभूषण पाटील यांना व्यासपीठावर  बसण्याचा अधिकार आहे का? असा मुद्दा मांडला. एकेरी शब्दप्रयोग आणि तोडपानीचा आरोप झाल्याने दोन्ही चांगलेच गरम झाले होते. इतर सदस्यांनी मध्यस्थी केल्याने वाद मिटला आणि पुढील विषयांना सुरुवात झाली.

महासभेच्या शेवटी शेवटी पुन्हा वाद निर्माण झाला. उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या प्रभागात दलितोत्तर वस्ती सुधार योजनेंतर्गत ५ कोटींच्या कामाचे कार्यादेश देण्यावरून वादाला सुरुवात झाली. महासभेत मतदान घेण्याचा मुद्दा मांडण्यात आला असता दोन्ही पक्षाकडून मतदान झाले. भाजपाला २६ तर शिवसेनेला २५ मते पडल्याचा दावा केला जात आहे. महापौर जयश्री महाजन यांनी समसमान मते पडल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर लागलीच राष्ट्रगीताला सुरुवात झाल्यानंतर खरा गोंधळ सुरु झाला. उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी मतदान प्रक्रिया पार पडलेल्या कागदावर राष्ट्रगीत सुरु असताना खाडाखोड केल्याचा आरोप नगरसेवक कैलास सोनवणे यांनी केला. राष्ट्रगीत सुरु असताना नगरसेवक कैलास सोनवणे देखील व्यासपीठावर धावून गेले.

राष्ट्रगीताचा अवमान केल्याने गेल्या दोन दिवसांपासून भाजप, शिवसेना आक्रमक झाले असून सर्वच पदाधिकारी आपापली बाजू मांडत गुन्हा दाखल करण्याचा पवित्रा घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने देखील या वादात उडी घेत पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे. मनपा प्रशासनाने गुन्हा दाखल करावा अशी देखील मागणी होत आहे. मुळात राष्ट्रगीताचा अवमान झाल्याचा आरोप करणारे आणि अवमान करणारे दोन्ही पदाधिकारी राष्ट्रभक्त आहेत. संपूर्ण जळगावकरांनी हा वाद पाहिला असून त्यावर संतप्त प्रतिक्रिया देखील उमटल्या. जळगावच्या राजकारणात आजवर न झालेला प्रकार त्या दिवशी घडला होता.

राष्ट्रगीताचा अवमान झाला आणि गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणाऱ्यांपैकी कुणीही गुन्हा दाखल करण्यासाठी प्रत्यक्षात पोलीस ठाण्यात पोहचले नाही. नगरसेवक कैलास सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत ‘मी चुकीचे कार्य रोखण्यासाठी व्यासपीठावर गेलो होतो आणि तेव्हा राष्ट्रगीत संपलेच होते. मी अपमान केला असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करावा’ अशी भूमिका त्यांनी जाहीर केली. भूमिका सर्वच जाहीर करीत असले तरी गुन्हा दाखल होईल असे सध्यातरी काही दिसत नाही. राष्ट्रगीताचा झालेला अवमान सर्वांनी पचवला तर ‘त्या’ महासभेत झालेला गोंधळ म्हणजे ‘हाय व्होल्टेज पॉलिटिकल ड्रामा’ होता असेच म्हणावे लागेल.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.