जळगाव लाईव्ह न्यूज । २० सप्टेंबर २०२२ । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेत दोन गट पडले आहे. यामुळे शिंदे गट आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच असते. आता दसरा मेळाव्यावरुन या दोन्ही गटात जुंपली असल्याचं पाहायला मिळत असून यातच राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि शिंदेगटाचे नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
आमचा दसरा मेळावा हिंदुत्वाच्या विचारांचा आहे. पण उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा शरद पवार आणि सोनिया गांधींच्या मिक्स विचारांचा होणार आहे, अशी टीका मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 20 सप्टेंबर रोजीच्या जिल्हा दौऱ्याच्या नियोजनासाठी पाळधी येथील सुगोकी हॉटेलजवळच्या फार्म हाऊसमध्ये आयोजित मेळाव्यात गुलाबराव पाटील बोलत होते.
आमचा दसरा मेळावा बघायला बाळासाहेबांचा आत्मा येईल!, असंही मंत्री गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले आहेत. मधल्या काळात आम्ही हिंदुत्वाच्या विचार सोडून दुसऱ्या ट्रॅकला गेलो होतो. पण आता पुन्हा हिंदुत्वाच्या विचारांसाठी भगवा झेंडा आम्ही हाती घेतला आहे, असं म्हणत त्यांनी आपला अजेंडा स्पष्ट केलाय.