मी संजय राऊतलाही घाम आणतो, माझ्या नादी काय लागता ; गुलाबराव पाटील कडाडले

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२३ । राज्यात शिवसेनेत दोन गट पडले आहे. त्यामुळे दोन्ही गटांकडून एकवेकांवर आरोप प्रत्यारोप करणे सुरु आहे. त्यातच शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. गुलाबराव पाटलाच्या नादी काय लागतात, मी बारक्यांची लढाई करत नाही. मी संजय राऊतलाही घाम आणतो, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले.

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील दोनगाव इथे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विकासकामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी पाटील बोलत होते.

गुलाबराव पाटील यांनी उध्दव ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर कडाडून टीका केली. उध्दव ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली होती. या टीकेला पाटील यांनी जोरदार उत्तर दिलं. माझ्या नादी काय लागता. मी बारक्यांच्या नादी लागत नाही. संजय राऊतांसारख्या माणसाला मी घाम फोडतो असे पाटील म्हणाले. विधानसभेत नुसता उभा राहिलो तर समोरच्याला प्रश्न पडतो भाऊ काय बोलणार आहे, असेही पाटील म्हणाले.