पाळधीजवळ भीषण अपघात; दोन दुचाकींच्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू

जून 23, 2026 9:01 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटना काही कमी होताना दिसत नसून याच दरम्यान धरणगाव तालुक्यातील पाळधी परिसरात दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. किरण बाबूलाल राक्षे-मराठे (वय ३८, रा. पथराड, ता. धरणगाव), चेतन पाटील (वय ३५, रा. वाडेगुडे, ता. भडगाव) आणि प्रदीप उखा निकम (वय ४०, रा. गोंदेगाव-निंभोरा, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) असे अपघातातील मृतांचे नाव असून या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

paldhiacd

मिळालेल्या माहितीनुसार, किरण राक्षे हे पद्मालय येथे एका लग्न समारंभासाठी गेले होते. लग्न आटोपून ते आपले वडील बाबूलाल राक्षे यांच्यासह दुचाकीने घरी परतत असताना, पाळधीजवळ समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दोन्ही दुचाकींवरील किरण, चेतन आणि प्रदीप या तिघांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेत जखमींना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर किरण राक्षे, चेतन पाटील आणि प्रदीप निकम यांना मृत घोषित केले. तर बाबूलाल राक्षे यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या घटनेची नोंद रामानंदनगर पोलिस ठाण्यात झिरो क्रमांकाने करण्यात आली असून पुढील तपासासाठी प्रकरण पाळधी आऊटपोस्टकडे वर्ग करण्यात आले आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

दरम्यान, या दुर्घटनेमुळे संबंधित गावांमध्ये शोककळा पसरली आहे. किरण राक्षे हे वेल्डिंग व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई-वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. तर चेतन पाटील हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्याच्या पश्चात आई-वडील आणि पत्नी असा परिवार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now