जळगाव लाईव्ह न्यूज । देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाचे बंद घर फोडून लाखो रुपयांचा ऐवज लांबवणाऱ्या टोळीचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी धरणगाव येथून दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, एका विधीसंघर्षग्रस्त (नाबालिक) बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींकडून गुन्ह्यातील ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव येथील फिर्यादी हे २३ मार्च २०२६ रोजी आपल्या कुटुंबासह देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले होते. याच संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १,९८,०००/- रुपये किमतीचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी ३१ मार्च रोजी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना समांतर आणि सखोल तपास करण्याचे आदेश दिले. त्यानुसार एलसीबीचे एक विशेष पथक तयार करण्यात आले.
पथकाने घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. सुरुवातीला कोणताही ठोस पुरावा हाती लागत नसताना, पोलिसांनी आपली गोपनीय माहिती यंत्रणा आणि तांत्रिक विश्लेषण सक्रिय केले. या तपासाच्या आधारे पोलिसांनी संशयावरून संदीप थोरात (वय २६, रा. एकता नगर, धरणगाव) आणि कार्तिक उर्फ आबा महाजन (वय २०, रा. संजयनगर, धरणगाव) यांच्यासह एका अल्पवयीन बालकाला ताब्यात घेतले. पोलिसांच्या खाक्या दाखवताच तिघांनीही गुन्ह्याची कबुली दिली.
कारवाईदरम्यान आरोपींकडून ६२ हजार रुपये रोख, ३ हजार रुपये किमतीची १८ ग्रॅम वजनाची चांदीची लंगड आणि १० हजार रुपये किमतीची सुमारे ३.२१० ग्रॅम वजनाची सोन्याची लंगड असा एकूण ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
यांनी केली कारवाई :
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चोपडा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, विष्णू बिऱ्हाडे, दीपक माळी, रवींद्र पाटील, ईश्वर पाटील, रावसाहेब पाटील आणि महेश सोमवंशी यांच्या पथकाने केली.








