⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार – राज्यपाल

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ फेब्रुवारी २०२२ । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची वाटचाल अत्यंत समाधानकारक असून या विद्यापीठाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज व्यवस्थापन परिषदेला दिली. राज्यपाल कोश्यारी हे आज विद्यापीठात जलतरण तलावाच्या उदघाटनासाठी आले होते. उदघाटनापूर्वी त्यांनी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्यांशी संवाद साधला.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, साधने मर्यादित असतांनाही उत्तम काम करता येते. विद्यापीठाच्या प्रश्नांसाठी वित्त विभाग व मंत्रालयातील इतर विभागांशी समन्वय ठेऊन विद्यापीठांनी प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने तीस वर्षात उत्तम काम केले आहे. शिक्षक, कर्मचारी व इतर सर्व घटकांचे जे जे प्रश्न आहेत. त्यासाठी आपण निश्चित पुढाकार घेऊन मार्ग काढू त्याचबरोबर आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्र्यांसोबतही बोलू अशी ग्वाही दिली. विद्यापीठाचे प्रवेशद्वार उत्तम असून आत मध्ये प्रवेश केल्याबरोबर बहिणाबाईंच्या कविता पाहून मन भारावते. असे सांगुन कोश्यारी यांनी पुन्हा वेळ काढून या विद्यापीठाला भेट देईल असे सांगितले.

यावेळी बोलतांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विद्यापीठाच्या विकासासाठी राज्यपालांनी मदत करण्याबरोबरच कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधासोबत इतरही मागण्यांसाठी लक्ष घालण्याची विनंती केली. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानपीठ उभे राहत आहे म्हणून या भागातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

प्रारंभी प्रभारी कुलसचिव प्रा. रा. ल. शिंदे यांनी प्रास्ताविक करतांना जलतरण तलावाची सविस्तर माहिती दिली. प्रभारी कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी विद्यापीठाची थोडक्यात माहिती दिली. व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील यांनी मोलगी, जिल्हा नंदूरबार येथील आदिवासी पाड्यात विद्यापीठ संचलित वरिष्ठ महाविद्यालय काढण्यात आले असून त्याला विशेष निधी द्यावा अशी मागणी राज्यपालांकडे केली. विद्यापीठातील विविध विद्यार्थी योजनांची माहिती देऊन विद्यार्थी केंद्रबिंदू मानून विद्यापीठाची वाटचाल सूरु असल्याचे त्यांनी सांगितले. दीपक पाटील यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यापीठाकडून राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली.

जलतरण तलावाचे उद्घाटन
विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात उभारण्यात आलेल्या जलतरण तलावाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. जलतरण तलाव पाहून श्री. कोश्यारी यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, प्रभारी कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन, प्रभारी प्र-कुलगुरू प्रा. बी. व्ही. पवार, प्रभारी कुलसचिव प्रा. रा. ल. शिंदे, विद्यापीठ कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील, क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील यांच्यासह विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सर्व सदस्य उपस्थित होते.

विद्यापीठात आठ लेनचा हा अद्ययावत असा जलतरण तलाव बांधण्यात आला असून त्यासाठी पाच कोटी ६३ लाख, ७५ हजार ९५८ एवढा खर्च आला असून त्यापैकी २ कोटी २५ लाख निधी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून प्राप्त झाला तर उर्वरित ३ कोटी ३८ लाख ७५ हजार ९५८ रूपये विद्यापीठ निधीतून खर्च करण्यात आले. या जलतरण तलावाचे क्षेत्रफळ ३,५१७ स्के.मी. असून ५० मी.x २५ मी. ऑलिम्पीक आकाराचा हा तलाव २६.८५ लाख लिटर क्षमतेचा आहे.

हे देखील वाचा :