⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

खुशखबर.. सोने 1100 रुपयांपेक्षा जास्तने तर चांदी 2500 रुपयांनी घसरली, काय आहे आजचा भाव?

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ फेब्रुवारी २०२३ । देशाचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर भारतीय सराफ बाजारात सोने (Gold Rate) आणि चांदीच्या (Silver Rate) किमतीत मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली. ऐन लग्नसाईत सोन्याने नवीन उच्चांकी दर गाठला आहे. अशातच तुम्हीही आज सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर काल शुक्रवारी सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झालेली आहे. त्यामुळे सततच्या तेजीच्या काळात तुम्हाला स्वस्त सोने खरेदी करण्याची संधी आहे. Gold Silver Price Today

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरील दर?
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आठवड्यातील शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याच्या किमतीत तब्बल 1135 रुपयाची घसरण झालेली आहे. त्यामुळे 24 कॅरेट सोन्याचा दर 56,560 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचला. गेल्या व्यापार सत्रात सोन्याचा भाव 58,610 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता.

तर दुसरीकडे चांदीच्या किमतीत जोरदार घसरण झालेली दिसून येतेय. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर शुक्रवारी चांदीच्या किमतीत 2579 रुपयाची घसरण झालेली दिसून येतेय. त्यामुळे चांदी 67,625 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.

जळगावात काय आहे भाव?
जळगाव सुवर्णनगरीत 24 कॅरेट सोन्याचा भाव जवळपास 58,500 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. तर चांदी जवळपास 71,000 हजार रुपये प्रति किलो इतका आहे. जळगावमध्ये सोन्याच्या किमती इतक्या आधी कधीच पोहोचल्या नव्हत्या. सोन्याच्या किमतीत एवढी मोठी झेप घेतल्याने लग्नाच्या खरेदीसाठी येणाऱ्या लोकांच्या खिशावर मोठा ताण पडणार आहे. सध्या देशभरात लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे लोक सोने-चांदीची खरेदी जोरात करत आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची घसरण
जागतिक बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात घसरण होत आहे. परदेशी बाजारात सोन्याचा भाव 1,913 डॉलर प्रति औंस झाला, तर चांदीचा भाव 23.38 डॉलर प्रति औंस झाला.

जाणून घ्या तज्ज्ञांचे मत काय आहे?
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक यांनी सांगितले की, फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी व्याजदरांबाबत केलेल्या आक्रमक टिप्पण्यांनंतर सोन्याच्या किमती नऊ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत. यानंतर, गुंतवणूकदारांनी केलेल्या नफावसुलीमुळे, कॉमेक्समध्ये सोन्याचे भाव त्यांच्या सर्वोच्च स्तरावरून खाली आले आणि गुरुवारी 1.94 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.