बातम्या

गोदावरी नर्सिंगचे रजीस्ट्रार प्रवीण कोल्हे यांचा अपघाती मृत्यू

पिंपरूड फाट्याजवळील घटना ; चार जण जखमी

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव येथील गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे रजीस्ट्रार प्रवीण कोल्हे ( वय ४८, रा. रोझोदा, ह.मु. जळगाव) हे भुसावळ येथील लग्नकार्य आटोपून मूळगावी रोझोदा येथे जातांना फैजपूरनजीक १४ रोजी मध्यरात्री १.३० वा. यांच्या वाहनाला अपघात झाला. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी त्यांना तातडीने डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान शुक्रवारी १५ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. या अपघातात त्यांच्या परिवारातील पत्नी, मुलगी आणि आई हे तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे रजीस्ट्रार प्रवीण कोल्हे हे परिवारासह १३ मे रोजी भुसावळ येथे चुलत भावाच्या लग्नकार्यानिमीत्त एमएच १९ सीव्ही ०६२४ या वाहनाने गेले होते. गोरज मुहूर्ताचे लग्नकार्य आटोपून ते त्यांच्या मुळगावी रोझोदा येथे जाण्यासाठी निघाले असता पिंपरूड फाट्याजवळ त्यांची कार एका झाडावर जाऊन आदळली.

या भीषण अपघातात प्रवीण कोल्हे हे गंभीररित्या जखमी झाले. तर परिवारातील त्यांची आई उषा प्रल्हाद कोल्हे (वय ६९), पत्नी हर्षा प्रवीण कोल्हे (वय ३८), मुलगी निर्मीती प्रवीण कोल्हे (वय १०) आणि वहीनी भावना नीलेश कोल्हे (वय ४१) हे जखमी झाले आहेत. अपघातानंतर सर्व जखमींना उपचारासाठी डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात हलविण्यात आले होते. शुक्रवारी १५ मे रोजी उपचारादरम्यान प्रवीण कोल्हे यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे गोदावरी परिवारावर शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, दोन भाऊ असा परिवार आहे. प्रवीण कोल्हे यांच्या अपघातील मृत्यूबद्दल माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी शोक व्यक्त केला आहे. यासंदर्भात नशिराबाद पोलिसात नोंद घेण्यात आली असून फैैजपूर पोलीस ठाण्यात पंचनामा करण्यात आला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button