जळगावात ‘एटीएम कार्ड’ बदलून लुटणारी टोळीचा पर्दाफाश; धुळ्यातून एकाला अटक, दुसरा फरार

मे 5, 2026 2:40 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील एटीएम केंद्रांवर नागरिकांचे लक्ष विचलित करून त्यांच्या खात्यातून पैसे लांबवणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एकाला धुळे येथून ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून २ लाख ३१ हजार रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा उघडकीस आला आहे. या गुन्ह्यातील त्याचा दुसरा साथीदार मात्र अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

kulbhushanpatil firing case arrest

गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहर आणि परिसरात एटीएम केंद्रांवर नागरिकांना गाठून फसवणूक करण्याचे प्रकार वाढले होते. ही टोळी प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक, महिला किंवा एटीएमचा वापर नीट न समजणाऱ्या भोळ्याभाबड्या नागरिकांना आपले टार्गेट करायची. “तुम्हाला पैसे काढून देण्यास मदत करतो” असे भासवून हे भामटे नागरिकांचे लक्ष विचलित करायचे आणि अत्यंत कौशल्याने त्यांचे मूळ एटीएम कार्ड बदलून दुसरेच बनावट कार्ड त्यांच्या हातात टेकवायचे. यादरम्यान ते नागरिकांचा एटीएम पिन (PIN) देखील चोरून पाहायचे.

बेंडाळे चौकातील ‘त्या’ घटनेने फुटले धागेदोरे!

२६ मार्च २०२६ रोजी जळगाव शहरातील बेंडाळे चौक परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) एटीएममध्ये एक तक्रारदार पैसे काढण्यासाठी गेले होते. यावेळी एटीएम केंद्रात दबा धरून बसलेल्या एका अनोळखी व्यक्तीने त्यांचे लक्ष विचलित केले आणि त्यांचे एटीएम कार्ड हातचलाखीने बदलले.

तक्रारदाराचा पिन नंबर आधीच माहीत असल्यामुळे, आरोपींनी या कार्डचा वापर करून धुळे, नंदुरबार आणि मालेगाव अशा विविध शहरांतील वेगवेगळ्या एटीएमधून तक्रारदाराच्या खात्यातून एकूण २ लाख ३१ हजार रुपये काढून घेत पोबारा केला होता. या फसवणूकप्रकरणी जळगावच्या जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला. तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला. आरोपी शोएब हबीब शेख (वय ४५, रा. लाला सरदार नगर, धुळे) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचा साथीदार शेख कमालुद्दीन खान (रा. अंधेरी, मुंबई) फरार असून त्याचा शोध सुरू आहे. विशेष म्हणजे, या फरार आरोपीवर मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील कांदिवली, कामोठे, कळंबोली, वाशी यांसारख्या ठिकाणी फसवणुकीचे १० हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदिप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि राहुल गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगांव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, पो.हे.कॉ.प्रविण मांडोळे, पो.हे.कॉ. संदिप पाटील, पो.हे.कॉ. हरिलाल पाटील, पो.हे.कॉ. राहुल बैसाणे, पोलीस अंमलदार राहुल कोळी, पोलीस अंमलदार विलास गायकवाड या पथकाने उल्लेखनिय कामगिरी केलेली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now