जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२२ । यावल येथील ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर होईल. त्यात डिजिटल हेल्थ आयडी, आयुष्यमान भारत कार्ड धारकांची तज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी, गरजूंना मोफत शस्त्रक्रियांना लाभ दिला जाईल.
स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान, सार्वजनिक आरोग्य विभागाने यावल ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी मोफत सर्वरोग निदान शिबिर आयोजित केले आहे. त्यात हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब, मेंदूचे आजार, फुप्फुसाचे आजार, कर्करोग, गरोदर माता व महिलांची आरोग्य तपासणी, लहान मुलांचे आजार, मूत्रपिंड आजार, मोतीबिंदू, त्वचारोग, गुप्तरोग, कान-नाक- घसा, अस्थिरोग, एचआयव्ही तपासणी, क्षयरोग, दंतरोग, कुष्ठरोगाची तपासणी होईल. मोफत रक्त-लघवी, एक्स-रे आणि ईसीजी देखील करून मिळेल. या मेळाव्याला पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार शिरिष चौधरी आदी उपस्थित राहतील. आयोजन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी भीमाशंकर जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शुभम तिडके यांनी केले.