⁠ 
गुरूवार, एप्रिल 18, 2024

कंत्राटदाराची ४५ लाखाची फसवणूक, गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२२ । एका शासकीय कंत्राटदाराची सुमारे ४५ लाख रूपयात फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकणारी रामानंद नगर पोलिसांत चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

लालसिंग हिलालसिंग पाटील (वय ७०, रा. जयनगर) यांची एल. एच. पाटील कन्स्ट्रक्शन प्रा. लि. नावाची फर्म आहे. त्यांनी दि. १० जानेवारी २०१७ रोजी पुणे येथील ग्रॅव्हीटी ग्रुपचे अक्षय ओंकार चोपडे यांना शरसोली व नागदुली शिवारातील शेताच्या शेडचे बांधकाम करण्याचे काम दिले होते. त्यापोटी १३ लाख ७८ हजार रुपयांचा धनादेशही दिला. तो वटवून त्यांनी हे पैसे घेतले होते. यासाठी नाना उखा बोरसे यांनी मध्यस्थी केली होती.

दरम्यान, अक्षय चोपडे याने पैसे घेऊन देखील काम सुरू न केल्याने एल.एच. पाटील यांनी सातत्याने याबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे त्यांनी रामानंदनगर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली. त्यानुसार अक्षय ओंकार चोपडे, दीपक गंगाराम लांघी व सुयेश गजानन तिटकरे (संचालक, ग्रॅव्हिटी ग्रुप) आणि नाना उखा बोरसे या चौघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात त्यांनी शासकीय नियमानुसार त्यावरील व्याज व शेडच्या कामाची आजची किंमत असे सुमारे ४५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.