जळगाव लाईव्ह न्यूज । ‘बाहेर जाऊ नका’ असा घरच्यांनी दिलेला सल्ला न ऐकता लस्सी पिण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एकाच कुटुंबातील चौघांवर काळाने भीषण घाला घातला. भरधाव चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील चौघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना भुसावळ तालुक्यातील फुलगाव परिसरातील हिरा मारुतीजवळ शुक्रवारी (५ जून) दुपारी घडली.

विजय शंकर काळे (१९), ऐश्वर्या बहाद्दूर भोसले (३०), विघ्नेश शंकर चव्हाण (१४) आणि मोनालिसा शिवबसप्पा भोसले (१) अशी मृतांची नावे असून ते सर्व मलकापूर येथील रहिवासी होते.या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात ठार झालेले चौघेही मूळचे मलकापूर येथील रहिवासी होते. मात्र, मजुरीच्या कामासाठी ते वरणगाव-दीपनगर दरम्यान असलेल्या कपिलवस्तीनगरात तात्पुरते राहत होते. शुक्रवारी दुपारी हे चौघे जण लस्सी पिण्यासाठी दुचाकीवरून घराबाहेर पडत होते. त्यावेळी घरच्यांनी त्यांना ‘बाहेर जाऊ नका’ असे बजावले होते, मात्र घरच्यांचे सांगणे बाजूला ठेवून ते घराबाहेर पडले आणि फुलगाव परिसरात त्यांच्यावर काळाने झडप घातली.
मृत चौघे दुचाकीने (क्रमांक MH 22 BD 3681) वरणगावकडे येत होते. याच दरम्यान, हिरा मारुतीजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या स्कार्पिओ गाडीने (क्रमांक MH 19 EV 5353) त्यांच्या दुचाकीला अत्यंत भीषण धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, दुचाकीवरील चौघांचाही जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर स्कार्पिओ चालक गाडी घटनास्थळीच सोडून फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच वरणगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, फरार स्कार्पिओ चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता.










