⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

ओलसरपणामुळे त्वचेचे आजार जडण्याची भीती ; अशी घ्या काळजी

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२१ । पावसाळ्यात ओले झाल्यामुळे किंवा ओलसरपणामुळे त्वचेचे आजार जडण्याची भीती राहते. त्वचाविकार झाल्यास वेळेवर उपचार नाही घेतले तर मोठे आजार होऊ शकतात.  म्हणून त्वचेच्या आरोग्याविषयी दक्ष राहावे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगावचे त्वचा व गुप्तरोगतज्ज्ञ डॉ. स्मित पवार यांनी दिली आहे. 

पावसाळ्यामध्ये हवेतील आर्द्रतेमुळे त्वचेचे आजार होण्याची शक्यता अधिक असते. ओलाव्यामुळे अनेकदा त्वचेला संसर्गही होतो. साध्या पुरळ उठण्यापासून ते त्वचेवर चट्टे उमटण्यापर्यंत अनेक त्वचाविकारांची लागण पावसाळ्यात होते. कपडे ओले, दमट राहिल्यानेही पावसातील त्वचाविकारांमध्ये भर पडते. पावसाच्या पाण्यात भिजल्यामुळे त्वचा ओलसर राहते. अशावेळी त्वचेवरच्या बुरशीला वाढीसाठी पोषक वातावरण मिळते. त्यामुळे त्वचेला खाज येणे तसेच गोल रिंगच्या आकाराचे चट्टे उठणे आदी समस्या उद्भवतात. लाल चट्टे मुख्यतः जांघेत, ओटीपोटावर, काखेत, दिसतात. शरीरावरच्या घड्यांमध्ये हा आजार आढळतो. साहजिक आहे की, घड्यांमध्ये घाम जास्त सुटतो. या भागांमध्ये घर्षणाचं प्रमाणही जास्तीच असतं. 

पावसाळ्यात त्वचा दमट राहिल्यामुळे हा आजार निर्माण करणाऱ्या बुरशीची वाढ होते. मग जांघेतला, काखेतला लालपणा आणि खाज वाढते. अनेकदा खाजवून खाजवून जखमाही होऊ शकतात. तसेच जर ती जागा अस्वच्छ असली तर, खाजवून पू भारलेले फोडही निर्माण होऊ शकतात. पायांच्या किंवा हातांच्या बोटांमध्ये जेव्हा ही बुरशी वाढते, तेव्हा आपण चिखल्या झाल्या आहेत, असं म्हणतो. बोटांमध्ये खोलगट आणि पांढरट खड्डा निर्माण होतो, ज्यात कंड सुटू शकतो व कधी कधी वेदनाही होऊ शकतात. पुरुषांमध्ये शिश्नमुंडाचा व त्याच्या टोकाचा दाह जो होतो त्याचं मुख्य कारण कॅन्डीडीयासिस आहे. मधुमेहाच्या  आजाराशी कॅन्डीडीयासीसचं इतकं घट्ट नातं आहे की ज्या लोकांना हा त्रास सतत होत राहतो, त्यांच्या रक्त तपासणीत हमखास मधुमेहाचे निदान होतं.

अंगावर जर बुरशी झाली तर त्वचेचा दाह निर्माण करते, तसेच त्वचेवर सामान्यरित्या आढळणारे अनेक जीवाणू आहेत ज्यांच्यामुळे आजार होऊ शकतात. दमट त्वचेमुळे या जीवाणूंना आजार निर्माण करण्याची संधी मिळते. यात केसांच्या बिजकोशांवर सूज निर्माण होते व पू भरलेले फोड दिसयला लागतात. हा आजार केसाळ भागांमध्ये दिसतो. फोडांना अनेकदा कंड सुटू शकतो व वेदनाही होऊ शकतात. हाच आजार जर विकोपाला गेला तर गळू निर्माण होतो. विषाणूच्या संक्रमणामुळे ताप भरला असेल, तर त्याचे प्रभाव किंवा लक्षणे पुरळाच्या माध्यमातून त्वचेवर उमटू शकतात. पिटीरीयासीस रोसिया असा एक आजार आहे. ज्यात आधी घशात विषाणूंचे संक्रमण होते आणि मग त्वचेवर त्याचे परिणाम दिसून येतात. या आजारामध्ये लाल गोल चट्टे उमटतात, ज्यांना कंड सुटतो. संपूर्ण शरीरावर ते दिसतात.

घामोळं आलं की शरीरावर, विशेषतः पाठीवर खाज सुटते. नीट तपासलं तर घामोळे प्रामुख्याने आढळतात. हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे घाम निर्माण करणाऱ्या ग्रंथीचे तोंड बंद होऊ शकतं. ज्यामुळे घाम हा त्वचेच्या आतच साचतो आणि मग फुटतो. इसब आजारात त्वचा कोरडी पडू लागते. कोरड्या त्वचेला कंड सुटतो आणि मग इसब सारखे आजार दिसायला लागते. तिच्यावर चट्टे येतात. काही वेळा किटक चावल्यामुळे डास चावल्याने होणारा आजाराला त्वचेवरचे पित्त म्हणता येईल. सहसा डास चावल्यावर त्या जागी छोटी लाल गांधी उठते ज्याला कंड सुटतो. त्या जागी जखमसुद्धा होऊ शकते. त्यामुळे त्वचेत रक्तस्राव होऊन त्वचेवर नीळसर काळे चपटे डाग निर्माण होऊ शकतात.

त्वचेच्या आजारावर उपचार करताना नखं लावून जखमा चिघळवू नका. ओले कपडे खूप वेळ अंगावर बाळगू नका. जिन्ससारखे खूप काळ अंगावर फिट्ट बसणारे कपडे घालणे टाळा. औषध विक्रेत्याने दिलेली कोणतीही  क्रीम परस्पर लावू नका. त्वचेची आग होणे, खाज सुटणे तक्रार असेल तर जखम होईस्तोवर खाजवू नका.  पायांना जखमा असतील तर स्लिपर्सचा वापर टाळा. ओल्या चपलांमुळे पायाला होणारे आजार बळावतात, पायात मोजे घालू नका. रसायनांचा तीव्र वापर केलेला साबण टाळा.  मधुमेह असेल तर या काळात रक्त तपासणी करणे टाळू नका अशी माहिती देखील  डॉ. स्मित पवार यांनी दिली आहे. उपचार करण्यासाठी किंवा सल्ला घेण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या ओपीडी मध्ये कक्ष क्रमांक ३०२ येथे यावे असे आवाहन करण्यात आले आहे.