⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसानीचे सत्र सुरूच : अट्रावल शिवारात केळी कापून फेकली

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२२ । यावल तालुक्यात शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसानीचे सत्र सुरूच आहे. अट्रावल शिवारात कापणी योग्य झालेल्या केळी बागेतील एक हजार केळी खोड अज्ञात माथेफिरूने कापून फेकले. यात सुमारे एक लाखाचे नुकसान झाले असून या प्रकरणी येथील पोलिसांत अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान या नुकसानीमुळे शेतकरी हैराण झाले असून माथेफिरूचा शाेध घेऊन कठाेर कारवाईची मागणी त्यांच्याकडून हाेत आहे.

अट्रावल येथील शेतकरी अशोक तुकाराम बाउस्कर यांचे गावालगत श्री मुंजोबा महाराज मंदिरामागे शेत आहे. त्यांनी चार हजार खोड केळी लावले असून ती केळी व्यापारी चिंतामण पंढरीनाथ तायडे यांना उक्त्याने दिली होती. ही केळी कापणी योग्य झाली असताना गुरुवारी व्यापारी तायडे शेतात गेले असता त्यांना केळीच्या चार हजार खोडापैकी अंदाजे एक हजार केळी घड कापून फेकल्याचे निदर्शनास आले. आजच्या बाजार भावानुसार या केळीची किंमत लाखाे रुपये आहे. या प्रकरणी अशोक बाउस्कर यांच्या फिर्यादीवरून यावल पोलिसांत गुन्हा दाखल झाला. तपास हवालदार अशोक जवरे करत आहे.