हृदयद्रावक : कडबाकुट्टीने भरलेले ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळले, अन्..

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ एप्रिल २०२३ । जामनेर तालुक्यातून एक हृदयदायक घटना समोर आलीय. कडबाकुट्टीने भरलेले ट्रॅक्टर घराकडे निघालेला असतानाच बांधालगत असलेल्या दुसऱ्या शेतकऱ्याच्या विहिरीत कोसळला. यावेळी ट्रॅक्टर अंगावर पडल्याने त्याखाली दबून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. सुपडू सुकदेव देसाई (वय ६५ वर्ष, रा. सामरोद ता. जामनेर) असं मृत शेतकऱ्याचे नाव असून या दुर्दैवी घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत जामनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नेमकी काय आहे घटना?
जामनेर तालुक्यात सामरोद येथील रहिवाशी सुपडू देसाई हे शेती करत असून ते शुक्रवारी दुपारी गोठ्यातील गुरांना कडबा कुट्टी आणण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन शेतात गेले होते. कडबाकुट्टी आणत असताना ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटलं.

त्यामुळे शेतकरी ट्रॅक्टरसह बांधालगत असलेल्या दुसऱ्या शेतकऱ्याच्या विहिरीत कोसळला. ट्रॅक्टर अंगावर पडल्याने सुपडू सुकदेव देसाई यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी शेताकडे धाव घेतली.

दरम्यान शेतात त्यांचा मुलगा दुसरे काम करत होता, घटनेची माहिती मिळाल्यावर त्याला धक्का बसला. घटनास्थळ गाठल्यावर त्याने प्रचंड आक्रोश केला. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.