पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नावे बनावट फेसबुक खाते ; मित्रांना पैशांची मागणी

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२१ । गेल्या काही वर्षात सोशल मिडियाद्वारे होणाऱ्या फसवणुकीच्या प्रकारात मोठी वाढ झाली आहे. अलीकडच्या काळात चक्क वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नावे बनावट फेसबूक खाते तयार करून त्यांच्याच मित्रांना पैशांची मागणी करण्याचे प्रकार वाढू लागले आहे. गेल्या ४ दिवसात दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बाबतीत हे प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यवतमाळ पोलीस अधीक्षक आणि धुळे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या नावे बनावट फेसबूक खाते तयार करण्यात आले होते.

जळगाव शहरात गेल्या महिन्यात पोलीस कर्मचारी मनोज सुरवाडे यांच्या नावे आणि पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या नावे बनावट फेसबूक खाते तयार करून मित्रांना पैसे मागण्याचा प्रकार घडला होता. दोन्ही प्रकार ताजे असतानाच आणखी दोन प्रकार समोर आले आहेत.

यवतमाळचे जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ हे असून ‘एसपी यवतमाळ’ हे कार्यालयीन फेसबुक अकाऊंट आहे. कुणीतरी ‘एसपी यवतमाळ’ नावाचे फेसबुक खाते तयार करुन त्यावर पोलिस अधिक्षकांचा फोटो अपलोड केला. आरोपीने त्यांचे मित्र आणि नातेवाईकांसोबत चॅटींग करत आर्थिक अडचण दाखवत पैशांची मागणी सुरु केली. गुगल पे असल्यास तातडीने पैशांची मागणी केल्यामुळे सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या सर्व प्रकाराचा एका मित्राला संशय आला. त्याने थेट पोलिस अधिक्षकांसोबत संपर्क साधत हा गैरप्रकार लक्षात आणून दिला. त्यामुळे पोलिसांनी हे बनावट खाते तात्काळ बंद करत यवतमाळ शहर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीच्या आधारे बनावट खाते तयार करणाऱ्या अज्ञाताविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

सोमवारी धुळे येथील अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट तयार करण्यात आले होते. मंगळवारी त्यांच्या ओळखीतल्या मित्रांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांना पैशांची मागणी करण्यात आली. काही मित्रांसोबत हा प्रकार घडल्याने त्यांनी अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांना कळविले, त्यांनी तात्काळ सायबर सेलला याबाबत तक्रार केली.