जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२२ । रावेर तालुक्यात पंचायत समितीमार्फत राबवण्यात आलेल्या वैयक्तिक शौचालय योजनेत तब्बल दीड कोटी रूपयांचा अपहार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गट समन्वयक समाधान निंभोरे व समूह समन्वयक मंजुश्री पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कंत्राटी कामगार असलेल्या दोघांची सेवा समाप्त करत कार्यमुक्त केले आहे.
तालुक्यात राबवलेल्या वैयक्तिक शौचालय अनुदान योजनेत गैरव्यवहार झाल्याबाबत ‘दिव्य मराठी’ सर्वप्रथम वृत्त प्रकाशित केले होते. नंतर बीडीओ दीपाली कोतवाल यांनी त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली होती. या समितीने दिलेल्या अहवालात प्रथम दर्शनी १ कोटी ५२ लाख ६४ हजार रुपयांचा अपहार झाल्याचे दिसून आले. त्यामुळे गट समन्वयक समाधान निंभोरे व समूह समन्वयक मंजुश्री पवार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.