जळगाव लाईव्ह न्यूज । सध्या जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा चाळीशी पार गेल्याने नागरिक उष्णतेच्या तडाख्याने होरपळून निघत असतानाच, भुसावळ शहरातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. वाढत्या उष्णतेचा फटका बसून उष्माघातामुळे एका ७३ वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. कुमुदिनी सुधाकर पाटील (वय ७३, रा. शास्त्रीनगर, नांदेड) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड येथील रहिवासी असलेल्या कुमुदिनी पाटील या सावदा (ता. रावेर) येथे एका नातेवाइकाकडे लग्नानिमित्त आल्या होत्या. लग्न आटोपल्यानंतर त्या भुसावळ शहरातील तापी नगर परिसरात राहणाऱ्या आपल्या दुसऱ्या नातेवाइकांकडे जाण्यासाठी निघाल्या. दुपारी भुसावळ शहरात कडक ऊन पडले होते आणि उष्णतेची तीव्र लाट होती. याच दरम्यान रस्त्याने जात असताना कुमुदिनी पाटील यांना अचानक तीव्र उष्णतेमुळे चक्कर आली आणि त्या जागीच बेशुद्ध पडल्या.

घटनेनंतर नातेवाइकांनी तातडीने त्यांना उपजिल्हा रुग्णालय तथा ट्रॉमा केअर सेंटर येथे दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पंकज सुरेश पाटील यांच्या माहितीवरून शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक इकबाल सय्यद करीत आहेत.










