⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

Eknath Shinde Update : एकनाथ शिंदेंच्या जीवावर पक्षांतर केलेले उपमहापौरांसह फुटीर नगरसेवक व्हेंटिलेटरवर

जळगाव लाईव्ह न्युज | २१ जून २०२२ । राज्यसभा निवडणूक व विधानपरिषद निवडणूकमध्ये लागोपाठ दोन वेळा धोबीपछाड मिळालेल्या महाविकास आघाडीला अजून मोठा एक धक्का बसला आहे. कारण शिवसेनेचे प्रती मुख्यमंत्री म्हटले जाणारे एकनाथ शिंदे शिवसेनेच्या २५ आमदारांसह नॉट रिचेबल झाले आहेत. या २५ आमदारांसह ४ मंत्री नॉट रिचेबल असल्याचे म्हटले जात आहे. यात अब्दुल सत्तर, संदीप भुंब्रे, यांचाही समावेश आहे.यामुळे जळगाव मनपातले जे नगरसेवक एकनाथ शिंदेंच्या जीवावर भाजपा मधून शिवसेनेत आले ते व्हेंटिलेटरवर आले आहेत. कारण उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या नेतुत्वात जळगाव मनपात झालेले सत्ता पालट हे एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शना खाली झाली होती. यामुळे आता ते नगरसेवक टेन्शन मध्ये आले आहेत

२२ एप्रिल २०२१ रोजी भाजपमध्ये उभी फूट पाडून शिवसेनेने सत्ता संपादन केली होते. उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या नेतृत्वाखालील नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने हे सत्तांतर घडले होते. स्वत: कुलभूषण पाटील हे एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक असल्यामुळे त्यांच्या आशीर्वादानेच शिवसेनेला सत्ता मिळाली होती. मध्यंतरी अनेक प्रसंगांमध्ये एकनाथ शिंदे हेच महापालिकेतील सत्ताधार्‍यांशी थेट संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले होते. आता शिंदे यांनीच बंडखोरीचा पवित्रा घेतल्याने महापालिकेतील सत्तेलाही सुरूंग लागण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे हे भाजपच्या सोबत जाऊन सत्तेत सहभागी होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास महापालिकेतील सत्ताधारी हे जर त्यांच्या सोबत गेलेत तर पुन्हा एकदा भाजप अथवा शिंदे यांच्या गटाकडे महापालिकेची सूत्रे जाऊ शकतात. म्हणजेच शिंदेंच्या बंडखोरीचे सतरा मजलीतल्या सत्ताधार्‍यांना नक्कीच टेन्शन आल्याचे दिसून येत आहे.यातचआता उपमहापौर कुलभूषण पाटील काय पवित्रा घेतात हे पाहणे लक्षणीय असणार आहे. याबाबाद उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क झाला नाही.

गेल्या वर्षभरापासून नगरविकासमंत्री एकनाथराव शिंदे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारवर नाराज आहेत. त्यांच्या गटातील अनेक आमदार देखील महाविकास आघाडीवर नाराज आहेत.राज्यसभेनंतर कालच विधान परिषदेत देखील भाजपने महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. आपल्या अपयशाची कारणे शोधण्यासाठी शिवसेनेने आज बैठकीचे आयोजन केले होते. दरम्यान, काल सायंकाळपासून नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे त्यांच्या गटातील आमदार नॉटरिचेबल असल्याचे म्हटले जात आहे. याची खबर मातोश्रीवर पोहोचताच उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर आमदारांच्या विशेष बैठकीचे आयोजन केले होते मात्र या ठिकाणी स्वतः एकनाथ शिंदेसह आमदार नॉटरिचेबल असल्यामुळे त्या ठिकाणी आली नाहीत यामुळे आता ते कोणचा टोकाचं पाऊल उचलतात का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.