
जळगाव लाईव्ह न्यूज । दिवाळीच्या काळात विमान प्रवासासाठी मोठी रक्कम मोजावी लागलेल्या प्रवाशांना आता काहीसा दिलासा मिळाला आहे. जळगाव-पुणे विमान मार्गावरील तिकीट दरात मोठी घट झाली असून, १ ते १५ डिसेंबरदरम्यान पुण्याला जाण्यासाठी २ हजार ७०० ते ३ हजार रुपयांच्या आसपास तिकीट उपलब्ध होत आहे. मात्र, गोवा मार्गावरील तिकीट दर अजूनही ७ हजार ५०० ते ८ हजार रुपयांच्या घरात आहेत.
दिवाळीच्या सुट्यांमध्ये जळगावहून पुणे, गोवा आणि हैदराबाद या मार्गांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे सलग २२ दिवस विमानांचे बुकिंग फुल्ल होते. पुणे मार्गावरील तिकीट दरही यावेळी १० हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते. आता मात्र प्रवाशांची संख्या कमी झाल्याने पुणे मार्गावरील दरात लक्षणीय घट झाली आहे.
पुण्याचे तिकीट स्वस्त
२९ नोव्हेंबरला जळगाव-पुणे विमानाचे तिकीट सुमारे ८ हजार ९९९ रुपयांपर्यंत आहे, तर ३० नोव्हेंबरला सुमारे ४ हजार ५०० रुपयांत तिकीट उपलब्ध आहे. त्यानंतर डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात तिकीट दर आणखी कमी होत असून, २ हजार ७०० ते ३ हजार रुपयांदरम्यान प्रवास करता येणार आहे.
गोव्याचा प्रवास अजूनही महाग
गोवा मार्गावरील परिस्थिती मात्र वेगळी आहे. प्रवाशांचा प्रतिसाद कायम असल्याने या मार्गावरील तिकीट दर चढेच आहेत. २६ नोव्हेंबरचे बुकिंग पूर्ण झाले असून, ९ डिसेंबरचा अपवाद वगळता १५ डिसेंबरपर्यंत गोव्याचे तिकीट दर ७ हजार ५०० ते ८ हजार रुपयांच्या आसपास आहेत.
परतीच्या प्रवासासाठीही ३० नोव्हेंबर आणि ६ डिसेंबरचे बुकिंग पूर्ण झाले आहे. १५ डिसेंबरपर्यंत परतीच्या प्रवासासाठी प्रति सीट सुमारे ८ हजार ९२ रुपयांपर्यंत भाडे मोजावे लागत आहे. त्यामुळे सध्या जळगावहून पुण्याची हवाई सफर स्वस्त झाली असली, तरी गोव्याचा विमान प्रवास मात्र महागच असल्याचे चित्र आहे.





