महाराष्ट्रराजकारण

मोठी बातमी : अखेर शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवलं, नव्या चिन्हासाठी सोमवारपर्यंतची मुदत

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑक्टोबर २०२२ । राज्यातील शिवसेना विरुद्ध शिवसेनेचा पेच आता वेगळ्याच वळणावर येऊन पोहोचला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १० ऑक्टोबरला होणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह वापरता येणार नाही. शिवसेना पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. दोन्ही गटांना नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत निवडणूक आयोगाला पर्याय द्यायचे आहे.

शिवसेना विरुद्ध शिवसेना वाद दिल्लीत पोहचल्यावर सर्वोच्च न्यायालयात आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरू झाली होती. केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरुन गेल्या अनेक दिवसांपासून सुनावणी सुरु होती. निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळ दिला होता. शिंदे गटाने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडे लवकरात लवकर याबाबतचा निकाल मार्गी लावावा, अशी मागणी केली होती. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं होतं. तर ठाकरे गटाकडून आपण सगळे कागदपत्रे सादर करु, पण आपल्याला पुरेसा वेळ द्यावा, अशी मागणी केली होती. विशेष म्हणजे काल निवडणूक आयोगाच्या सुनावणीत देखील शिवसेनेकडून तीन आठवड्यांचा वेळ मागवण्यात आला होता. पण निवडणूक आयोगाने दोन्ही गटासाठी 24 तासांचा अवधी दिला होता.

शनिवारी अखेर या प्रकरणी निवडणूक आयोगाची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सलग चार तास बैठक झाली. या बैठकीनंतर निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह आणि नाव गोठवण्याचा निर्णय घेतला.

शिवसेनेत फूट पडल्यापासून दोन्ही गटाकडून खरी शिवसेना आपलीच असल्याचा दावा केला जात होता. शिंदे गटाने तर 40 आमदार, 12 खासदार आणि लाखो पदाधिकारी आपल्या बाजूने असल्याचा दावा केला होता. विशेष म्हणजे शिंदे गटाने त्याबाबतचे कायदेशीर पुरावे देखील निवडणूक आयोगाकडे देखील सादर केले होते. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून देखील काही कागदपत्रे जमा करण्यात आले होते. रात्री ठाकरे गटाने मेल देखील केला होता. दोन्ही गटाने आपापली भूमिका स्पष्ट करण्यात आली होती.


चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Related Articles

Back to top button