जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । वाढती महागाई लक्षात घेत सर्वसामान्य जनतेची दिवाळी गोड व्हावी, या उद्देशाने शिंदे सरकारने गोरगरीबांना ‘आनंदाची शिधा’ म्हणजेच शंभर रुपयांत चार प्रमुख वस्तु किलोभर रवा, चनादाळ एक किलो, साखर एक किलो आणि पामतेल एक लीटर या वस्तु गरीबांना रेशनद्वारे उपलब्ध करून देण्याचे योजिले. दरम्यान दिवाळी तोंडावर असताना, बुधवारी मुक्ताईनगर मतदार संघांचे आ. चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार श्वेता संचेती यांनी ‘आनंदाची शिधा’वाटपेचा शुभारंभ केला. सर्वत्र गोरगरीबांचा दिवाळी सण उत्साहात साजरा, मात्र पुरवठा विभागाच्या योग्य नियोजनाअभावी तालुक्यातील अनेक गावांतील हजारो शिधापत्रिका धारक गोरगरीबांना अद्यापपर्यत आनंदाची शिधा पोहचली नाही. तर उर्वरीत काही ठिकाणी चार वस्तुपैकी फक्त पामतेल व रवा या दोनच वस्तु उपलब्ध केल्या जात आहे. यामुळे ऐन दिवाळी सणाच्या दिवशी साखर व चनादाळ मिळत नसल्याने गरीबांची अपेक्षाभंग झाली आहे.
तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे सुकळी, दुई, हरताळा, मानेगाव, वढवे, चांगदेव, मेहुण, चिंचोल, सातोड, निमखेडी खुर्द, पिंप्रीआकाराऊत, ढोरमाळ, रुईखेडा, घोडसगाव, कुंड व चिखलीसह इतर काही गावातील गोरगरीब जनतेला चार वस्तुपैकी साखर व चनादाळ या दोन वस्तु मिळाल्या नसून दिवाळी झाल्यानंतर उपलब्ध केल्या जातील अशी माहीती सुत्रांकडुन समजते. याबाबत वेळेवर माल पोहच करण्यास मजुरांची टंचाई असल्याचे कारण समोर केले जात असल्याची माहीती कळते.
शिधेच्या प्रतिक्षेत असणाऱ्या धान्य दुकानदारांकडुन उपलब्ध असलेल्या पामतेल व रवा या दोन वस्तुंची वाटप करण्यात येत आहे. तसेच उर्वरीत दोन वस्तु दिवाळी झाल्यानंतर वाटप केली जाणार असल्याचे कळते. दरम्यान या प्रकारामुळे अपेक्षित जनतेची अपेक्षाभंग झाली असुन सदर गावातील जनतेकडुन तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.उत्सवासाठी लागणाऱ्या प्रमुख वस्तु अवघ्या १०० रुपयात मिळणार असल्याने गोरगरीबांसह सामान्य जनता ‘आनंदाची शिधे’च्या प्रतिक्षेत होती.मात्र यापैकी दोन वस्तु मिळाल्या नसल्याने काही ठिकाणी जनतेचा हिरामोड झाल्याची स्थिती दिसुन येत आहे.