मेडिकल स्टार्टअप्समुळे ग्रामीण आरोग्य यंत्रणेला बळकटी : डॉ.युवराज परदेशी

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जानेवारी २०२३ । पूर्वी स्टार्टअप ही संकल्पना केवळ आयटी, तंत्रज्ञान व कॉम्यूटरसारख्या मोजक्या क्षेत्रांपुराताच मर्यादित होती. मात्र कोरोना काळात आरोग्य क्षेत्राशी निगडीत अनेक स्टार्टअप सुरु झाले आहेत. त्यापैकी काही युनिकॉर्न क्लबमध्येही दाखल झाले आहेत. म्हणजे त्यांची उलाढाल ८ हजार कोटींच्या वर पोहचली आहे. आरोग्य क्षेत्रातील स्टार्टअप्समुळे ग्रामीण व दुर्गम भागात अत्याधुनिक व दर्जेदार वैद्यकीय सेवा व सुविधा उपलब्ध करुन देणे शक्य झाले आहे, असे मत स्टार्टअप अभ्यासक डॉ.युवराज परदेशी यांनी व्यक्त केले.

डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित फाऊंडेशन कोर्सप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलतांना डॉ.परदेशी म्हणाले की, अमेरिकेसह अनेक देशांनी मेडिकल स्टार्टअपवर लक्ष केंद्रीत केले आहे. भारतात मेडिकल स्टार्टअपला उज्वल भविष्य आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, भारताची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देणे हे मोठे आव्हान आहे.

अशा परिस्थितीत नवसंकल्पना व नवतंत्रज्ञानाचा वापर, हाच सर्वोत्तम मार्ग आहे. नेटमेड्स, फार्मईझी, हेल्थीफाय, टाटा हेल्थ, इनोव्हेसर, निरामाई, क्यूअर डॉट एआय यासारखे कितीतरी मेडिकल स्टार्टअप यशस्वीरित्या वाटचाल करत असल्याचे डॉ.परदेशी यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना स्टार्टअप म्हणजे काय? स्टार्टअप इन्क्यूबेशन म्हणजे काय?, फंडिंग कशी उभी करायची? आदींबाबत सखोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी बायोकेमेस्ट्री विभाग प्रमुख प्रो.डॉ. विठठल शिंदे हे उपस्थित होते.