जळगाव लाइव्ह न्यूज | राजकारणात पद मिळताच अनेकजण अधिकारांची भाषा करतात, मात्र भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी जळगाव महानगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाल्याचे प्रमाणपत्र स्वीकारताच, सर्वप्रथम आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिले आहे. त्यांनी आगामी २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा आपला वैयक्तिक मालमत्ता कर आगाऊ भरून शहरवासीयांसमोर एक आदर्श घालून दिला आहे.

जळगाव महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून डॉ. राधेश्याम चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. आज त्यांनी महानगरपालिका आयुक्तांकडून या निवडीचे अधिकृत प्रमाणपत्र स्वीकारले. हे प्रमाणपत्र हाती पडल्यानंतर त्यांनी कोणताही वेळ न घालवता महापालिकेत आपला आगामी वर्षाचा कर जमा केला आणि ‘जबाबदार नागरिक’ म्हणून आपली भूमिका स्पष्ट केली.

“प्रशासनाकडून सुविधा मिळण्याची अपेक्षा करणे हा नागरिकांचा हक्क आहे, मात्र मालमत्ता कर वेळेत भरणे हे आपले कर्तव्य आहे. मालमत्ता कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असून शहराच्या विकासासाठी तो महत्त्वाचा ठरतो. म्हणूनच मी प्रमाणपत्र स्वीकारताच सर्वप्रथम कर भरून माझे कर्तव्य पार पाडले.”
-डॉ. राधेश्याम चौधरी, जिल्हाध्यक्ष, भाजपा.
या नियुक्तीबद्दल डॉ. चौधरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार राजुमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह पक्षाचे सर्व कार्यकर्ते व नगरसेवकांचे आभार मानले.
डॉ. चौधरी यांनी यावेळी जळगावकरांनाही आवाहन केले की, ज्यांना शक्य असेल त्यांनी आपला मालमत्ता कर आगाऊ भरून महानगरपालिकेला सहकार्य करावे, जेणेकरून शहराच्या विकासकामांना गती मिळेल.
प्रमाणपत्र स्वीकारताना आणि कर भरताना डॉ. चौधरी यांच्यासोबत भाजप गटनेते प्रकाश बालानी, मनोज काळे, नितीन बर्डे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.











