जळगाव लाईव्ह न्यूज । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जळगाव शहरात उत्साहाचे अभूतपूर्व वातावरण पाहायला मिळाले. शहराच्या प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत हजारो भीमसैनिक निळे झेंडे आणि ‘जय भीम’च्या घोषणांनी सहभागी झाले होते. या सोहळ्याचे औचित्य साधून नगरसेवक विशाल सुरेश (राजूमामा) भोळे यांच्या तर्फे मिरवणुकीतील भीमसैनिकांसाठी थंड सरबत वाटपाचा उपक्रम राबवून सामाजिक बांधीलकी जपली.

सकाळपासूनच जळगाव शहरातील वातावरण भीममय झाले होते. सायंकाळी विविध मंडळांनी काढलेल्या भव्य मिरवणुकीत पारंपारिक वाद्ये, लेझीम पथके आणि बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित जिवंत देखाव्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या मिरवणुकीमध्ये भीमसैनिकांचा उत्साह दिसून आला.

दरम्यान, मिरवणुकीत सहभागी झालेल्या भीमसैनिकांना दिलासा मिळावा यासाठी विशाल भोळे यांच्या वतीने थंड सरबत वाटपाची व्यवस्था करण्यात आली होती. मिरवणूक मार्गावर येणाऱ्या प्रत्येक भीमभक्ताचे स्वागत करून त्यांना सरबत देण्यात येत होते.
विशाल भोळे यावेळी म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजापर्यंत पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे. जयंतीच्या उत्साहात सहभागी होणाऱ्या भीमभक्तांची सेवा करण्याची संधी मिळणे, हे मी माझे भाग्य समजतो.”
शिस्तबद्ध मिरवणूक
मिरवणूक मार्गावर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता, तर विविध सामाजिक संघटनांनी पाणी आणि अल्पोपहाराची सोय केली होती. जळगावातील या भव्य सोहळ्याने समता आणि बंधुभावाचा संदेश दिला.










