डोनाल्ड ट्रम्पची भारतावर ५०% टॅरिफची घोषणा ; भारतावर काय परिणाम होणार ?

ऑगस्ट 7, 2025 12:28 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑगस्ट २०२५ । अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापारी तणावाला एक नवीन वळण मिळाले आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी भारतीय वस्तूंवर २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ लावले. त्याबरोबर अमेरिकेत भारतीय वस्तूंवर लागणारे टॅरिफ आता ५० टक्क्यांवर पोहोचले आहे. भारताने रशियाकडून खनिज तेल खरेदी सुरूच ठेवल्यामुळे दंड म्हणून अतिरिक्त शुल्क लावण्यात येत असल्याचे ट्रम्प यांनी जारी केलेल्या कार्यकारी आदेशात म्हटले आहे.

trump

डोनाल्ड ट्रम्प मागच्या काही दिवसांपासून सातत्याने भारतावर टॅरिफ लावण्याची धमकी देत आहेत. त्यांनी ५० टक्के टॅरिफची घोषणा केली आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच अमेरिकेने भारतावर २५ टक्के टॅरिफ लावणार असल्याचं म्हटलं होतं.मात्र काल रात्री अमेरिकेकडून भारतावर ५० टक्के टॅरिफ लावल्याची घोषणा करण्यात आली.

व्हाईट हाऊसच्या मते, हा कर २७ ऑगस्ट २०२५ पासून लागू होईल. पहिल्या टप्प्यात आज म्हणजेच ७ ऑगस्टपासून २५% कर लागू करण्यात आला आहे आणि आता दुसरा २५% अतिरिक्त कर २७ ऑगस्टपासून लागू केला जाईल. अशाप्रकारे, भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या वस्तूंवर एकूण ५०% कर आकारला जाईल. आदेशानुसार, आदेश लागू होण्यापूर्वी समुद्री मार्गाने जाणाऱ्या आणि १७ सप्टेंबरपर्यंत अमेरिकन कस्टम्सने मंजुरी दिलेल्या वस्तूंना सूट दिली जाईल.

व्हाईट हाऊसने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की युक्रेन युद्धामुळे रशियावर लादलेल्या आर्थिक निर्बंधांची अधिक कठोर अंमलबजावणी करण्याचा एक भाग म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. अमेरिकेचा असा विश्वास आहे की भारत रशियाकडून थेट किंवा अप्रत्यक्षपणे तेल खरेदी करत आहे, ज्यामुळे रशियाला आर्थिकदृष्ट्या फायदा होत आहे. ट्रम्प प्रशासन याला अमेरिकेच्या परराष्ट्र धोरण आणि सुरक्षेसाठी धोका मानते.

भारत आता अमेरिकेत सर्वाधिक शुल्क लादणाऱ्या देशांच्या यादीत सामील झाला आहे. ब्राझीलवरही ५०% शुल्क लादण्यात आले आहे. याशिवाय, स्वित्झर्लंड (३९%), कॅनडा आणि इराक (३५%) आणि चीन (३०%) हे देशही ट्रम्पच्या नवीन आदेशांमुळे हैराण झाले आहेत. भारताने अमेरिकेच्या या पावलाला कठोर आणि अन्याय्य असल्याचे म्हटले आहे. भारत सरकारने म्हटले आहे की ते योग्य वेळी यावर योग्य प्रतिसाद देईल आणि त्यांच्या व्यापार हितांचे रक्षण करण्यासाठी शक्य ते सर्व पाऊल उचलेल.

भारतावर काय होणार परिणाम ?

अमेरिकेने लादलेल्या टॅरिफचा भारतावर मोठा आर्थिक परिणाम होऊ शकतो. अमेरिकेच्या टॅरिफचा कापड व रेडिमेड कपडे, रत्ने व आभूषणे, इंजिनिअरिंग सामान व ऑटो पार्ट्स, मसाले व कृषी उत्पादनांच्या मागणीवर विपरित परिणाम होऊ शकतो. मागणीवर परिणाम झाल्याने निर्यात घटू शकते व कंपन्यांतील लाखो नोकऱ्यांवर संकट येऊ शकते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now