जळगाव शहरातल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का ?

जळगाव लाईव्ह न्युज | २८ मे २०२२ | आपले संपूर्ण जीवन केवळ देश, मातृभूमी आणि स्वातंत्र्यासाठी अर्पण करणाऱ्या विज्ञाननिष्ठ, प्रखर हिंदुत्ववादी, कवी, लेखक भाषाशुद्धीचे प्रणेते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती. स्वतःच्या मातृभूमीला स्वातंत्र्य मिळावे यासाठीच त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यासाठी त्यांना अंदमान मधल्या सेल्युलर जेलमध्ये हाल सोसावे लागले. मात्र मातृभूमीसाठी त्यांनी हे हाल आनंदाने सोसले. अंदमानमध्ये त्यांच्यावर झालेले अगणित अत्याचार हे संपूर्ण देशाला माहीत आहेत. त्यांनी स्वतःला देशाच्या स्वातंत्र्यासाठी झोकून दिलं यासाठीच त्यांना नागरिकांनी ‘स्वातंत्र्यवीर’ ही पदवी दिली.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Swatantra Chowk Jalgaon) यांचा दैदिप्यमान पुतळा आपल्या जळगाव शहरात आहे. या पुतळ्याचा एक मोठा इतिहास आहे. 1985 साली तत्कालीन नगरपालिकेने जळगाव शहरामध्ये विविध पुतळे बांधण्यासाठी विशेष पुतळा समिती गठीत केली होती. नगर पालिकेच्या बांधकाम विभागा अंतर्गत ही समिती गठीत करण्यात आली होती. त्यावेळची नगरसेवक बन्सीलाल ओझा यांच्या पुढाकाराने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हा पुतळा आज आपल्याला पाहायला मिळतो आहे.

त्यावेळी बन्सीलाल ओझा यांनी अथक परिश्रम करून सावरकरांचा पुतळा जळगाव शहरात असावा अशी मागणी केली व ती मंजूरही झाली. त्यावेळी सावरकरांचा पुतळा कसा असावा यावरही वाद-प्रतिवाद चर्चा झाली. पूर्ण रुपी असावा की, अर्ध रुपी असावा यावर तेव्हा चर्चा झाली. मात्र सावरकरांचा पुरावा हा त्यांच्या प्रमाणेच त्यांच्या दैदिप्यमान कर्तृत्वा सारखाच असावा. अशी मागणी त्यावेळी करण्यात आली. म्हणूनच आज आपण सावरकरांचा असा दैदिप्यमान पुतळा बघतो आहोत.

सावरकरांना हिंदुहृदयसम्राट म्हणायचे आणि त्यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनाच बोलावण्यात आले होते. त्यावेळी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते असलेले मनोहर जोशी, शिवसेना नेते सुभाष देसाई, जळगाव शहराचे नगराध्यक्ष सुरेश जैन यांची देखील त्यादिवशी हजेरी होती.

21 नोव्हेंबर 1990 रोजी गुरुवारी या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. पुतळ्याची किंमत त्या वेळी अडीच लाख रुपये होती. शिल्पकार प्रमोद जोशी, आर्किटेक प्रकाश गुजराती, विजय वडगाव, यांच्या कुशल गुणांवर या पुतळ्याला इतके मोठे स्वरूप आले.