⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

दहा महिन्यांपासून दिवाबत्ती गुल, ग्रामपंचायत सदस्य झाले आक्रमक अन्..

जळगाव लाईव्ह न्युज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी ग्रामपंचायत अंतर्गत डोलारखेडा येथील सार्वजनिक दिवाबत्ती गेल्या दहा महिन्यांपासून गुल झालेली होती. याबाबत वेळोवेळी तक्रार मांडून देखील याकडे दुर्लक्ष केलं जात होत. दरम्यान ग्रामपंचायत सदस्याने आक्रमकपणा घेतल्याने ग्राम प्रशासनाने संबंधित ठिकाणी बल्ब लावले आहे.

सदर याबाबत ग्रामस्थांनी तोंडी तसेच लेखी तक्रार स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला दिल्यानंतर देखिल प्रशासनाने यासंदर्भात उडवाउडवीची उत्तरे देत वेळ मारुन नेली. तसेच संबंधित ठिकाणी बल्ब लावल्याचे बिल देखिल ग्रामपंचायतीने काढले असल्याची कथित चर्चेमुळे ग्रामस्थांच्या भावना अनावर झाल्या. गत सुमारे दहा महीन्यांचा कालावधी लोटला तरी याबाबतीत होत असलेल्या दुर्लक्षामुळे डोलारखेडा वाॅर्डातील ग्राम पंचायत सदस्या संगिता राजेंद्र भोई यांच्यासह काही ग्रामस्थांनी आक्रमक पणा घेत ग्रामपंचायत कार्यालयात येऊन संबंधितांना खडे बोल सुनावले तसेच याबाबतीत सोमवारी पंचायत समिती कार्यालयात जाऊन गटविकास अधिकारी यांचेकडे लेखी तक्रार देणार असल्याचे सांगितले.

दरम्यान या गोंधळामुळे पुरते भांबावलेल्या ग्राम प्रशासनाने आज सकाळी बल्बची व्यवस्था केली असल्याचे समोर आले. डोलारखेडा गाव मुक्ताई भवानी अभयारण्यातर्गत आहे. रात्री गावाच्या हद्दीवरुन वाघांसह इतर हिस्र पशूंचा वावर मोठ्य प्रमाणावर असतो. प्रसंगी संगिता भोई,विनोद थाटे,अमोल कोळी,शिवाजी वानखेडे,कल्पेश पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी आक्रमक पणा घेतला होता.