पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाच्या उद्घाटनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांची महत्वाची माहिती
जळगाव लाईव्ह न्यूज । १६ डिसेंबर २०२३ । जळगाव शहरात ‘महारेल’ने निर्माण केलेल्या पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाचे उद्घाटन उद्या म्हणजेच रविवार दिनांक १७ डिसेंबर रोजी होणार आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रात्री उशिरा सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.
यानुसार, महारेल द्वारे निर्माण केलेल्या पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण दि १७ डिसेंबर रोजी केंद्रीय रस्ते व वाहतूक आणि महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी व मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते आणि उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस आणि ना. अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे नामपूर येथून होणार आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व अन्य मान्यवर नेत्यांची उपस्थिती राहणार असल्याचे जिल्हाधिकार्यांनी नमूद केले आहे.
पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम वेगाने पूर्ण व्हावे म्हणून भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जळगावचे उपविभागीय अधिकारी महेश सुधाळकर व त्यांच्या टीमने खूप परिश्रम घेतले. या उड्डाणपुलामुळे जळगाव शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होईल, अशी आशा बाळगली जात आहे. रिंगरोडपासून सुरू झालेला हा उड्डाणपूल थेट कानळदा रस्त्याला जोडला जाणार आहे. त्यामुळे जळगावकरांना कोणत्याही विलंबाशिवाय आता थेट शिवाजीनगर भागात तसेच प्रस्तावित राज्यमार्गावरून थेट चोपडा तालुक्याकडे मार्गस्थ होता येणार आहे. याशिवाय उड्डाणपुलाचा एक आर्म पिंप्राळा उपनगराकडे वळविण्यात आलेला आहे. त्यामुळे वर्षानुवर्षांपासून रेल्वेगेटमुळे होणारी वाहतुकीची कोंडीची समस्या देखील आता कायमस्वरूपी दूर होणार आहे.