जळगाव जिल्हाहवामान

जळगावकरांना डबल धक्का; आधी कडक ऊन, मग अवकाळी सरी, वाचा हवामान अंदाज?

रविवार जळगावचे तापमान ठरले या हंगामातील आतापर्यंतचे सर्वाधिक

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ फेब्रुवारी २०२६ । जळगाव शहरासह जिल्ह्यातून थंडीने काढता पाय घेतला असून आता तापमानाचा पारा ३५ अंशाच्या वर गेल्यानं उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. दरम्यान, रविवार, २२ फेब्रुवारी रोजी जळगावचे तापमान या हंगामातील आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान ठरले आहे. काल जळगाव शहराचा पारा ३५.४ अंश सेल्सिअसवर पोहोचला होता

TPR

दरम्यान, पुढील काही दिवस तापमानात चढ-उतार पाहायला मिळेल. मात्र, मार्च महिना उजाडताच उन्हाची तीव्रता अधिक वाढणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. दुसरीकडे बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस होण्याचा आज अंदाज आहे.

जळगाव शहरासह जिल्ह्यातील तापमानात गेल्या आठवड्यापासून वाढ होताना दिसत आहे. रात्री आणि सकाळीचा गारवा बराच कमी झाला असून सकाळी १० वाजेपासूनच कडक ऊन पडत असल्यानं उन्हाचा चटका बसत आहे. मार्च महिन्यासारखे ऊन फेब्रुवारीतच पडत असल्यानं जळगावकरांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, काल रविवारी तर जळगावच्या तापमानाने यंदाच्या हंगामातील उच्चांकी तापमान गाठले आहे. आता २८ फेब्रुवारीपर्यंत शहराचे तापमान ३३ ते ३४ अंशांच्या दरम्यान स्थिरावलेले असेल. मात्र, ही स्थिती फार काळ टिकणार नाही. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात जळगावच्या तापमानात मोठी वाढ होणार आहे. १ ते ५ मार्चदरम्यान तापमान ३५ ते ३७ अंशांच्या दरम्यान जाण्याची शक्यता आहे. मात्र यानंतर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज आहे.

७ मार्चनंतर अवकाळी पावसाचे संकट

मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. ७ ते ८ मार्च दरम्यान जिल्ह्यात जोरदार अवकाळी पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. गेल्या वर्षीही जळगावकरांना केवळ एप्रिल महिन्यातच कडक उन्हाचा सामना करावा लागला होता. गेल्या वर्षी मार्च आणि मे महिन्यात पावसाने हजेरी लावली होती. यंदा मात्र मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून उन्हाची तीव्रता वाढणार आहे.

अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच वातावरणातील अचानक बदलामुळे सर्दी, ताप यांसारख्या आजारांमध्ये वाढ होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button