⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

Heat Wave : 72 तासात जळगावसह राज्याला बसणार मे हिटचा तडाखा

जळगाव लाईव्ह न्यूज : 10 मे 2023 : देशभरातील अनेक ठिकाणी मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाचा पारा 42 ते 44 अंशापर्यंत जातो. (Heat Wave) मात्र यंदा ऐन उन्हाळ्यात महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने उन्हाचा पारा 40 अंशखाली होता. परंतु आता उत्तर-मध्यसह देशातील बहुतांश भागात तापमानात मोठी वाढ झाली असून येत्या तीन दिवसात महाराष्ट्रासह 17 राज्यांमध्ये तापमानात मोठी वाढ होणार आहे.

या आठवड्यापासून देशातील बहुतांश भागात उष्णतेची लाट सुरू होईल. या आठवड्याभरात कमाल तापमान ४२ ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज हवामान खात्याच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.

जळगावला बसणार मे हिटचा तडाखा
राज्याच्या उत्तर आणि पश्चिमेकडील भागातून उष्ण आणि कोरडे वारे वाहत असल्याने अचानक तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पुढील काही दिवस तापमान जास्त राहणार आहे. मे हिटचा तडाखा अनेक जिल्ह्यांना जाणवणार आहे. जळगावात तापमान पुन्हा 42 ते 43 डिग्री अंश सेल्सिअसवर पोहचले आहे. काही दिवस उष्णतेची लाट अशीच राहणार असल्याने नागरिकांनी उन्हापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद अकोल्यात झाली आहे. अकोल्यात ४२ अंश सेल्सियवर तापमान गेले आहे. जळगाव ४१, वर्धात ४० अंश सेल्सियस तापमान होते.

उष्णघातापासून अशी घ्या काळजी
उष्णता टाळायची असेल तर भरपूर पाणी प्या. कारण उन्हाळ्याच्या ऋतूत उन्हात चालल्याने खूप घाम येतो, ज्यामुळे आपल्या शरीरात पाण्याची कमतरता भासते. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी, ज्यूस, नारळपाणी, लिंबूपाणी यांचे सेवन करावे. त्याचबरोबर जर तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या असेल तर तुम्हाला चक्कर येणे, थकवा येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

जास्त वेळ बाहेर राहू नका
उन्हात बाहेर फिरण्यामुळे उष्माघात होऊ शकतो. त्यामुळे गरज नसेल तर बाहेर पडू नका. उन्हात जाताना कॅप, ओढणी, रुमालाच्या मदतीने शरीर झाकून ठेवा.