⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

शिवसेनेचे आमदारकीचे स्वप्न म्हणजे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने : दीपक साखरे

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जुलै २०२१ । शहर मनपातील सत्ता बदल जळगावच्या विकासासाठी कि आमदार होण्यासाठी? असा टोला भाजपचे जळगाव विधानसभा क्षेत्रप्रमुख दीपक साखरे यांनी उपस्थित केला आहे. तसेच आपल्या आमदारकीच्या चर्चा म्हणजे शेजारच्या मुलांवर आपल्या सुखी म्हातारपणाचे स्वप्न पाहणे असाच असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला आहे.

दीपक साखरे यांनी पुढे म्हटले आहे की, मार्च २०२१ ला जळगाव मनपामध्ये मोठे बदल झाले सत्ताधारी भाजपचे पाशवी बहुमत असताना शिवसनेने भजपाचे ३० नगरसेवक घेत सत्ता बदल घडवून आणला. ३० नगरसेवक पक्ष सोडून जाताना एकच तुणतुणं वाजवत होते जळगावचा विकास. आज पाच महिन्यात जळगावच्या जनतेला काय मिळाले हे मात्र संशोधन करण्याचा विषय असेल पण पक्ष सोडून गेलेल्या नगरसेवक यांचा मात्र विकास होतोय हे नक्की. कारण या पाच महिन्यात जळगावला शिवसेनेचे राज्यस्तरीय अनेक नेते येउन गेले. त्यात संजय राऊत, संजय सांवत, मंत्री एकनाथ शिंदे असे वजनदार शिवसेना नेते येउन गेले परंतु जळगाव मनपाला एक दमडी सुद्धा शासनाकडून दिली नाही फक्त खमंग बातम्या पेरायच्या आणि प्रसिद्धी मिळवायची मग हा बदल होऊन कोणते बदल झाले.

शिवसेना पक्षाच्या काही नगरसेवक यांना आमदारकीची तीव्र इच्छा होती परंतु जळगाव मनपा ताब्यात असेल तर आमदार होऊ शकतो असा समज असणारे शिवसेना नेते यांनी भाजपामध्ये असणारी धुसफूस व असंतुष्ट आत्मे यांना आमिष दाखवून पक्षद्रोह करण्यास भाग पाडले व जळगाव मनपामध्ये शिवसेनेचा महापौर निवडून आणला. परंतु या ३० नगरसेवक यांच्या शक्तीवर आमदारकिचे तिकीट तर दुसरेच घेणार. यांच्या वाटेला अपात्रेतचा शिक्का मात्र नक्की येणार हे नक्की. म्हणजे मेहनत कोणाची आणि फायदा कोणाचा?

शिवसेनेचा महापौर झाल्याने शिवसेना पक्षात सुद्धा आमदारकीची चढाओढ सुरु झाली आहे. नाही म्हटलं तरी शिवसेना पक्षात आज ६ नगरसेवक आमदारकीची तयारी करत आहे. खरं पाहता शिवसेना पक्षाला जळगाव शहरात स्वतःचे नगरसेवक निवडून आणता आले नाही. जे नगरसेवक स्वतःला शिवसैनिक समजतात ते सुरेशदादांचे सैनिक आहे. मूळ शिवसैनिक या सत्ता बदलात पार दूर फेकले गेले. याचे कारण म्हणजे ते निष्ठावंत शिवसैनिक आहे.

मनपात सत्ता बदल होताच असे अनेक बदल होतात, होत असतात. परंतु मुंगेरीलाल के हसीन सपने पाहणारे हे विसरले कि अजून त्यांचा मित्र पक्ष राष्ट्रवादीचे पण आमदारकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे. त्यांचे काय त्यांना तर आपण मोजतच नाही आपली महाविकास आघाडी आहे हे आपण विसरलात कि काय? तसे पहिले तर जळगाव शहराची विधानसभा ही जळगावच्या मनपावर सत्ता कोणाची यावर कधीच अवलंबून नव्हती हे भाजपने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत दाखवून दिले.

२०१४ साली भाजपचे फक्त १४ नगरसेवक जळगाव मनपामध्ये होते. आज जे नगरसेवक पक्ष सोडून गेले व आज जे भाजपात आहे. त्यातले तर अनेक भाजपच्या विरुद्ध प्रचार करत होते. परंतु भाजपाला काही एक फरक पडला नाही. कारण भाजपा हा नगरसेवक यांच्यावर अवलंबून निवडणूक लढवणारा पक्ष नाही.  त्यामुळे गेलेले नगरसेवक यांच्यामुळे भजपाचे कोणतेही नुकसान झाले नाही. नुकसान जळगावच्या जनतेचे होत आहे.

अडीच वर्षात भाजपने महाराष्ट्र सरकारकडून ७०० ते ८०० कोटींचा निधी आणला. जळगाव मनपा कर्जमुक्त केली आहे हे जळगाव चे नागरिक आणि मतदार ओळखून आहे. भाजपने असा आमदार दिला आहे कि, जो जळगावकरांच्या संपर्कात २४ तास ३६५ दिवस असतो. कोणत्याही गोरगरीब व्यक्तीच्या हाकेला आवाज देउन त्याच्यापर्यंत स्वतः पोहचतो. भाजपचा खरा पाया हा पक्षाचा कार्यकर्ता व जळगाव शहराचा मतदार हाच आहे. त्यामुळे मनपामध्ये किती नगरसेवक भाजपाचे आहे यावर भाजपा विधानसभा अवलंबून कधीच नव्हती आणि आज पण नाही. त्यामुळे मुंगेरीलाल के हसीन सपने पाहायला मनाई थोडीच आहे. ही विधानसभा २०२४ मध्ये ही भाजपाची राहील यात तिळमात्र शंका नाही. असे दीपक साखरे यांनी म्हटले आहे.