⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

एवढा मोठा ‘तो’ नेता होऊन गेला, शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची ऑडिओ क्लिप व्हायरल

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२१ । जळगाव शहरात विनापरवानगी बॅनरबाजी करणाऱ्यांवर महानगरपालिकेकडून गुन्हा दाखल करण्यात येत आहे. असे असले तरी बड्या व्यक्तींवर मात्र कारवाई करण्यास महापालिकेचा अतिक्रमण विभाग आखडता हात घेत आहे. दरम्यान, अशा लोकांविरोधात माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता हे मैदानात उतरले आहेत. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे व महानगर प्रमुख शरद तायडे हे शुभेच्छूक असलेले युवासेनेचे सहसचिव विराज कावडीया यांचे बॅनर सध्या शहरात चर्चेचा विषय बनला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांनी तक्रार केल्यावर ते बॅनर काढून घेण्यात आले असले तरी दीपककुमार गुप्ता यांची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जळगाव शहरात लावण्यात येणाऱ्या अनधिकृत बॅनरविरोधात माहीती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी महापालिकेकडे पाठपुरावा करून कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून विनापरवानगी लावण्यात आलेल्या बॅनरविरोधात कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. मंगळवारी शहरात १० जणांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. सोशल मिडियातील रेकॉर्डिंगनुसार युवासेनेचे सहसचिव विराज कावडीया यांच्या पांडे डेअरी चौकात लागलेल्या शुभेच्छा बॅनर संदर्भात माहीती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून शहरात अनधिकृतरित्या लागणाऱ्या बॅनरला तुमचे समर्थन आहे का? असा जाब विचारत आपल्या नावाने विराज कावडीया यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदनचे बॅनर लागले असल्याची माहिती दिली.

यावर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांनी हे बॅनर विराज कावडीया यांनी लावले असून तीन दिवसांपूर्वी ते बॅनर काढायला देखील सांगितले होते, असे उत्तर दिले. इतकंच नव्हे तर ‘मी जिल्हाप्रमुख आहे व ते महानगरप्रमुख आहेत. मात्र आम्हाला त्याने शुभेच्छूक बनवून टाकले आहे. ऐवढा मोठा नेता तो झालेला आहे, अशा आशयाची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तक्रारीनंतर काही मिनिटातच ते बॅनर हटविण्यात आले आहे.

ऐका नेमकं काय म्हटलं आहे या क्लिपमध्ये :