⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

Decision : भोंग्याबाबत लवकरच ठरणार नवीन धोरण, गृहमंत्र्यांनी दिले पोलीस प्रमुखांना आदेश

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२२ । मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत घेतलेली भूमिका सध्या चांगलीच गाजते आहे. भोंग्याबाबतच्या भुमिकेमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. गृहमंत्र्यांनी पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालकांना महत्वाचे आदेश दिले आहेत. भोंग्यासंदर्भात एकत्रित धोरण ठरवा असे आदेश राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत. राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांनी हे धोरण ठरवावं असं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितंल आहे. जातीय तेढ निर्माण केल्यास कठोर कारवाई करावी असेही आदेश त्यांनी दिले आहेत.

मशिदीवरील भोंग्याबाबत गेल्या काही दिवसापासून राज ठाकरे प्रचंड आक्रमक झाले आहे. दोन दिवसापूर्वी पुणे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे म्हणाले, भोंग्याचा फक्त हिंदू नाही तर मुस्लिमांनाही त्रास होत आहे. अनेक वर्ष हा प्रलंबित राहिलेला विषय आहे. तुम्ही जर पाच वेळा भोंगे लावणार असू तर आम्ही मशिदीसमोर हनुमान चालिसा लावू. देशभरातील सर्व देशभक्त हिंदू बांधवांना माझी विनंती आहे की तयारीत राहा. सध्या रमजान सुरु असल्याने काही सांगायचं नाही आहे. पण ३ तारखेपर्यंत यांना समजलं नाही आणि देशातील कायद्यापेक्षा, सुप्रीम कोर्टापेक्षा स्वत:चा धर्म, लाऊडस्पीकर मोठे वाटत असतील तर जशास तसं उत्तर देणं गरजेचं आहे असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.

ठाकरे पुढे म्हणाले, मनसे पक्ष म्हणून आमची सर्व बाजूंनी तयारी सुरु आहे. महाराष्ट्रात आणि देशात कोणत्याही प्रकारच्या दंगली नकोत. कोणत्याही हाणामारी नको आहे. शांतता भंग करण्याची इच्छाही नाही. माणुसकीच्या नात्याने मुस्लिम धर्मियांनी या गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. त्यांच्या प्रार्थनेला कोणीही विरोध केलेला नाही. पण जर लाऊडस्पीकरवर लावणार असतील तर आमच्याही आरत्या त्यांना ऐकाव्या लागतील असंही राज ठाकरे म्हणाले.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भोंग्यासंदर्भात एकत्रित धोरण ठरवा असे आदेश दिले आहेत. राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांनी हे धोरण ठरवावं असं त्यांनी सांगितंले आहे. जातीय तेढ निर्माण केल्यास कठोर कारवाई करावी असेही आदेश त्यांनी दिले आहेत. राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त एकत्रित बसून एक गाईडलाईन्स तयार करतील अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली. एक दोन दिवसात राज्यासाठी एकत्रित असं धोरण ठरवलं जाईल. मुंबईसह राज्यासाठी नोटीफिकेशन काढलं जाईल आणि त्यातून नियमावली जाहीर करण्यात येईल, असे गृहमंत्री म्हणाले.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नाव न घेता राज ठाकरेंना सूचक इशारा देखील दिला आहे. मी अनेकदा सांगितलं आहे की, जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये. जाणीवपूर्वक कोणाकडून प्रयत्न झाला तर आणि त्याच्यात तो दोषी आढळला तर त्याच्यावर कारवाई केली जाईल मग ती संघटना असो, व्यक्ती असो किंवा आणखी कोणीही असो असंही दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.