उपचाराअभावी सर्पदंश झालेल्या शेतकऱ्याचा मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जुलै २०२१ । जामनेर तालुक्यातील पहूर येथे ४८ वर्षीय शेतकऱ्याला रविवारी दुपारी सर्पदंश झाल्याने प्राथमिक उपचार करून जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले मात्र, याठिकाणी रुग्णवाहिकेतच डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना गोदावरी हॉस्पीटलला नेण्यास सांगितले. दरम्यान गोदावरी रुग्णालयात पोचताच त्यांचा मृत्यू झाला.

विनोद फकिरा चौधरी असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान, जीएमसीत उपचाराची सुविधा असताना उपचार करण्यास नकार दिला व रुग्णाला रुग्णवाहिकेतून उतरून घेण्याची तसदी घेतली नाही त्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

याबाबत असे की,पहूर येथील विनोद चौधरी हे आपला लहान भाऊ योगेशसोबत शेतात काम करत होते. काम करतानाच पायाला काहीतरी चावल्याचे जाणवल्याने विनोदनी योगेशला सांगितले. विषारी सापाने चावा घेतल्याचे लक्षात येताच त्यांना पहूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. याठिकाणी सलाईन लावून प्राथमिक उपचार करण्यात आले. प्रकृती बिघडत असल्याने त्यांना दुपारी जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन अहिरे यांनी त्यांना रुग्णवाहिकेतून उतरू देता तापमान, पल्स तपासून डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात नेण्यास सांगितले. तेथे पोहाेचताच त्यांचा मृत्यू झाला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कोविड असले तरी याठिकाणी सर्पदंश, श्वानदंश, किरकोळ जखमी यांच्यावर उपचार करण्याची व्यवस्था आहे. यासाठी लागणारी औषधी उपलब्ध आहे. असे असतानाही केवळ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे वेळेत उपचार न मिळाल्याने भावाचा मृत्यू झाल्याचा आरोप योगेश चौधरी यांनी केला