जळगाव लाईव्ह न्यूज । शासकीय कार्यालयांचे बनावट शिक्के आणि सक्षम अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर करून पारोळा तालुक्यातील पिंप्री मोंढाळे येथील तब्बल दोन एकर सरकारी गायरान जमीन लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी तात्कालीन ७ ग्रामसेवक, ८ सरपंच, ग्रामपंचायत कर्मचारी आणि इतर ४० भूमाफियांवर फौजदारी तसेच प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या कारवाईमुळे शासकीय जमिनी लाटणाऱ्या भूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.

या प्रकरणाचा पर्दाफाश सामाजिक कार्यकर्ते गुलाबराव जगन्नाथ पाटील यांनी केला. साडेचार वर्षांच्या सातत्यपूर्ण संघर्षानंतर अखेर प्रशासनाने या गैरव्यवहाराची गंभीर दखल घेतली.

पिंप्री मोंढाळे येथील गट क्रमांक १४० (सर्व्हे क्रमांक ८४) मधील सरकारी गायरान जमिनीचे संशयितांनी पूर्णपणे बनावट ‘नमुना क्रमांक ८’ चे उतारे तयार केले. या बनावट उताऱ्यांवर सक्षम शासकीय अधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या केल्या गेल्या आणि कार्यालयांचे बनावट शिक्के तयार करून मारण्यात आले. हा बनावट दस्तऐवज खरा असल्याचे भासवून संबंधित जमिनीची मालकी खासगी व्यक्तींची असल्याचे दाखवण्यात आले. त्यानंतर तत्कालीन ग्रामसेवक आणि सरपंचांच्या संगनमताने या बोगस नोंदी चक्क ग्रामपंचायतीच्या अधिकृत दप्तरी नोंदवण्यात आल्या.
या संपूर्ण प्रकारात तत्कालीन ग्रामसेवक आणि सरपंचांनी अधिकाराचा गैरवापर केल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे पारोळा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात जमिनीची मूळ मालकी न तपासता तब्बल २२ वेळा खरेदी-विक्री व्यवहारांची नोंद करण्यात आली. त्यामुळे ही जमीन पुढे अनेक नागरिकांना विकण्यात आली आणि फसवणुकीची मोठी साखळी तयार झाली. बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन नावावर करून घेतल्यानंतर संबंधित भूमाफियांनी त्या जागेवर पक्की बांधकामे, शेततळे तसेच पोल्ट्री फार्म उभारले. त्यामुळे सरकारी जमिनीवर प्रत्यक्ष कब्जा करण्यात आल्याचे समोर आले आहे.
तक्रारदार गुलाबराव पाटील यांनी गायरान जमिनीचा हा कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार जेव्हा पुराव्यासह उघड केला, तेव्हा आरोपींनी त्यांना रोखण्यासाठी सर्व मार्गांचा अवलंब केला. आरोपींनी पोलीस दलातील काही लोकांशी संगनमत करून तक्रारदार पाटील यांच्यावरच खोटे गुन्हे दाखल केले होते. साडेचार वर्षांच्या या संघर्षात त्यांना अनेक धमक्याही मिळाल्या, मात्र डगमगून न जाता त्यांनी आपला लढा सुरूच ठेवला.
अखेर, एरंडोल उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून घोटाळ्यावर शिक्कामोर्तब केले. या चौकशी अहवालानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.या प्रकरणात दोषी असलेल्या तत्कालीन ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसह इतर ४० भू माफियांवर गुन्हे दाखल करण्यात येतील.
हे आहेत दोषी
ग्रामसेवक, सरपंच तत्कालीन ग्रामसेवक डी. बी. पाटील, महेंद्र सोनवणे, एन. आर. चंदरै, दिवंगत दिलीप पाटील, राजेंद्र सोनवणे, हरिभाऊ मारवडकर, जगदीश बाविस्कर, तत्कालीन सरपंच राजेंद्र भीमराव पाटील, कैलास राघो पाटील, मीराबाई पाटील, गंभीर नत्थू पाटील, लताबाई पाटील, राजेंद्र भगवान पाटील, विजय भावराव पाटील, गोकुळ विसावे, प्रभारी सरपंच पुष्पा पाटील अशी जमिन लाटणाऱ्यांची नावे आहेत.











