⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

मंदाकिनी खडसेंना न्यायालयाचा मोठा दिलासा ; ‘या’ अटीशर्तींवर अंतरिम जामीन मंजूर

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जानेवारी २०२३ । पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या पत्नी मंदाकिनी खडसेंना पुन्हा एकदा न्यायालयाने दिलासा दिला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने 1 लाखाच्या जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केला आहे. मात्र, त्यांना देश सोडून जाण्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत.

मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यत एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्याविरोधातही सेशन्स कोर्टाने अटक वॉरंट काढले होते. त्यामुळे मंदाकिनी खडसे यांच्या अटकेची शक्यता होती. मात्र, मंदाकिनी खडसे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. कलम ८८ अन्वये सत्र न्यायालायत मंदाकिनी खडसे यांनी अंतरिम जामिनासाठी अर्ज केला. त्यानंतर मुंबई सत्र न्यायालयाने त्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

निर्बंध काय?
मंदाकिनी खडसे यांना अंतरिम जामीन मंजूर करताना न्यायालयाने त्यांच्यावर काही निर्बंधही लादले आहेत. जामीन कालावधीत मंदाकिनी यांनी पुराव्यांमध्ये कुठलीही छे़डछाड करू नये. देश सोडून जाऊन नये. इडीचे अधिकारी चौकशीसाठी बोलावतील तेव्हा यंत्रणेपुढे हजर राहावे, अशा अटी घालण्यात आल्या आहेत.

काय आहे प्रकरण?
पुण्यातील भोसरीमध्ये गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. ईडीने एकनाथ खडसेंची चौकशी केली होती. त्यानंतर गिरीश चौधरी यांना चौकशीसाठी बोलावले होते. ईडीने 13 तास चौकशी केली होती. त्यानंतर ईडीकडून गिरीश चौधरींना अटक करण्यात आली होती. या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.