कोरोना वाढतोय; महाराष्ट्रातील या जिल्ह्यात मास्कसक्ती

जळगाव लाईव्ह न्यूज | ४ एप्रिल २०२३ | देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. देशात गेल्या २४ तासांत ३ हजार ६४१ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. सध्या दिल्ली, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, उत्तर प्रदेशात सर्वाधिक रुग्ण आहेत. महाराष्ट्रातही कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सातारा जिल्ह्यात सरकारी कार्यालये, कॉलेज आणि बँकांत मास्क सक्ती करण्यात आली आहे.

सातार्‍याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य असल्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका, शाळा, महाविद्यालये यामधील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी खबरदारीचा उपाय म्हणून मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच गर्दीच्या आणि सार्वजनिक ठिकाणी जसे आठवडी बाजार, एसटी स्टँड परिसर, यात्रा, मेळावे, लग्नसमारंभ, मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येतात. अशा सर्व ठिकाणी सर्व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मास्कचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जयवंशी यांनी केले आहे.

वर्क फ्रॉम होम पुन्हा सुरु
देशात कोरोना पुन्हा परतू लागला आहे. दररोज तीन हजारपेक्षा अधिक रुग्ण सापडू लागले आहेत. दिल्ली एनसीआरमध्ये दिवसाला ५०० हून अधिक रुग्ण सापडत आहेत. हरियाणाने १०० हून अधिक लोकसंख्या असलेल्या भागात मास्क सक्ती केली आहे. तामिळनाडू सरकारनेही मास्कसक्ती केली आहे.
कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे पाहून कंपन्यांनी पुन्हा वर्क फ्रॉम होम सुरु केले आहे. मास्क सक्ती देखील करण्यात आली आहे. दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आपल्याला सतर्क रहावे लागेल, परंतू घाबरण्याचे कारण नाही असे सांगितले आहे.