जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑगस्ट २०२६ । गेल्या काही दिवसांपासून राज्यभर सक्रिय असलेल्या पावसाचा जोर आता हळूहळू कमी होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार, आज (४ ऑगस्ट) राज्यातील १० जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला असून विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मात्र, ६ ऑगस्टपासून राज्यात पावसाची मोठी विश्रांती मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्यातही गेल्या पाच-सहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र ऑगस्टच्या सुरुवातीपासूनच पावसाचा जोर ओसरला असून सध्या जिल्ह्यात ऊन-सावलीचा खेळ सुरू आहे. अधूनमधून तुरळक सरी कोसळत असल्या तरी आगामी काही दिवसांत जोरदार पावसाची शक्यता कमी आहे.

मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठीही दिलासा मिळाला असला, तरी आता पावसाने विश्रांती घेतल्याने उकाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
आज कुठे होणार पाऊस?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज पुणे घाट, सातारा घाट आणि कोल्हापूर घाट परिसरात पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळू शकतात. या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुढील तीन दिवसांचा अंदाज
५ ऑगस्ट : विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता कायम राहणार आहे. उर्वरित राज्यात पावसाचा जोर कमी राहील.
६ आणि ७ ऑगस्ट : राज्यातील बहुतांश भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून कोणत्याही जिल्ह्यासाठी मोठा पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही. त्यामुळे राज्यात पावसाची मोठी विश्रांती मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ज्या भागात पाऊस थांबेल तेथील शेतकऱ्यांना रखडलेली शेतीची कामे पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे. मात्र, पावसाळ्याचे दोन महिने उलटूनही राज्यातील अनेक भागांमध्ये अद्याप अपेक्षित पाऊस झालेला नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत उर्वरित भागात तुरळक पावसाच्या सरी पडू शकतात, मात्र व्यापक स्वरूपाच्या मुसळधार पावसाची शक्यता सध्या दिसत नाही.







