कोरोना बाधीत पत्रकारांना मोफत उपचार व मृतांना ५० लाख मदत मिळावी

 सावदा परिसरासह राज्यभरातील कोरोना काळात वृत्तसंकलन करण्यासाठी घराबाहेर पडताना जीवाची ही पर्वा न करता कोरोना काळात वृत्तसंकलन करणार्या पत्रकार बांधवांना कोरोना लागण झाल्यास मोफत औषधोपचार मिळावेत तसेच पत्रकाराचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास ५० लाख रुपयांची आर्थिक मदत मिळावी अशा मागणीचे निवेदन फैजपूर प्रांताधिकारींना सावदा येथील ताप्ती सातपुडा जर्नलीस्ट असोसिएशन व इंडियन जर्नलीस्ट असोसिएशन यांच्या वतीने देण्यात आले आहे.

कोरोना या महामारीने सर्वत्र हाहाकार माजविला आहे. अशा बिकट वातावरणात सर्व पत्रकार हे आपले कर्तव्य म्हणुन जोखिम पत्करुन वृत्त संकलासाठी फिरत असतात. त्यामुळे, देशासह राज्यात असंख्य पत्रकारांना कोरोना ची बाधा होऊन काही मयतही झाले आहेत. नुकतेच कैलास परदेशी रा. सावदा, परशुराम बोंडे, विजय घोरपडे रा. भुसावळ यांच्यासह जिल्ह्यातील जवळपास ७ ते ८ पत्रकारांचा आणि राज्यभरातील ७० ते ८० पत्रकारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.पत्रकार हे मानसेवी तत्वावर काम करीत असल्याने त्यांची अर्थीक परीस्थिती ही फारच नाजुक असते.

पत्रकार हे समाजातील महत्वाचा घटक व सामाजिक कामातही पुढेच असतात. त्यामुळे अनेक ठिकाणी पत्रकार बाधित होत आहेत. पण जेव्हा उपचार करण्याची वेळ येते तेव्हा बेड उपलब्ध होत नसतो. त्यासाठी पत्रकारांना मोफत उपचार मिळावे. व मयत झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना ५० लाख रु. आर्थिक मदत मिळावी. पत्रकार करीत असलेल्या सेवेचा गांभीर्य पुर्वक विचार करून वरील मागण्या मंजूर करण्यात यावी अशी विनंती  राज्य शासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी ताप्ती सातपुडा जर्नलीस्ट असोसिएशन सावदा अध्यक्ष शाम वसंत पाटील, उपाध्यक्ष प्रविण पाटील, सरचिटणीस अनोमदर्शी तायडे, कार्याध्यक्ष पंकज पाटील, प्रसिद्धी प्रमुख राजू दिपके, संपर्क प्रमुख साजीद शेख, सदस्य कमलाकर पाटील,भारत हिवरे,कामिल शेख, शाकीर मलिक यांच्यासह पत्रकार संस्था फैजपूर अध्यक्ष व इंडियन जर्नलीस्ट असोसिएशन जळगाव जिल्हाध्यक्ष फारुक शेख, इंडियन जर्नलीस्ट असोसिएशनचे वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष संदिप पाटील इत्यादी पत्रकार बांधव उपस्थित होते.